अकोला येथे हिंदूसंघटन मेळावा
अकोला, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – आज जगात हिंदूंसाठी एकही देश नाही. हिंदू संघटित नसल्यामुळे या देशाचे वेळोवेळी अनेक तुकडे झालेले आहेत. आजही भारताच्या वेगवेगळ्या भागांमधून धर्माधिष्ठित स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली जात आहे. आपल्या देशाची महान संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना जात-पात, पक्ष आणि संघटना असे अस्तित्व विसरून संघटितपणे प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. समितीच्या वतीने १ ऑक्टोबर या दिवशी अकोला येथील जानोरकर मंगल कार्यालय येथे झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात हिंदु धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’च्या अंतर्गत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
श्री. सुनील घनवट आणि अधिवक्ता मुकुंद जालनेकर यांच्या हस्ते समितीच्या ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. समितीच्या २० वर्षांतील यशोगाथेविषयी श्री. विद्याधर जोशी यांनी माहिती सांगितली. सूत्रसंचालन सौ. अश्विनी सरोदे यांनी केले. शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार उपस्थित धर्मप्रेमींनी केला.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात कायदेशीर साहाय्य करण्यासाठी सिद्ध आहे ! – अधिवक्ता मुकुंद जालनेकर
हिंदूंवर जाणीवपूर्वक सर्वत्र आक्रमणे केली जात आहेत. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भूमी बळकावण्याचे मोठे षड्यंत्र उघडकीस येत आहे. समितीच्या या कार्यात कायदेशीर साहाय्य करण्यासाठी मी नेहमीच सिद्ध असेन !
उपस्थित संघटना आणि मान्यवर
विदर्भ ब्राह्मण सभा, हिंदु महासभा, हिंदु राष्ट्र सेना, विश्व सनातन संघ, दुर्गावाहिनी, हिंदू दलित आघाडी, वन्दे मातरम् संघटना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, अधिवक्ता, उद्योगपती, तरुण विद्यार्थी यांसह अनेक मान्यवर अन् धर्माभिमानी हिंदू
क्षणचित्र : मेळाव्यानंतर झालेल्या बैठकीत धर्मप्रमींच्या उत्स्फूर्त सहभागातून हलालविरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली.
जानोरकर मंगल कार्यालयाचे मालक श्री. गुणवंत जानोरकर यांचा सत्कार करण्यात आला. मागील १० वर्षांपासून ते समितीच्या कार्यक्रमासाठी सातत्याने त्यांचे मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून देऊन ईश्वरी कार्यात सहभागी होत आहेत. |