‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळले नाही, तर कायदेशीर कारवाईचा विचार करू !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची चेतावणी !

हिंदु महासभा आणि भाजप यांचाही विरोध !

डावीकडे भाजप सरकारचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

भोपाळ (मध्यप्रदेश) – जर ‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्यात आली नाहीत, तर चित्रपटावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला जाईल, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे. ‘या संदर्भात चित्रपटाचे निर्माते ओम राऊत यांना मी स्वतः पत्र लिहून आक्षेपार्ह दृश्ये काढण्यास सांगणार आहे’, असेही मिश्रा यांनी सांगितले. आदिपुरुष चित्रपटाचा टिझर (चित्रपटाचा अत्यंत संक्षिप्त भाग) प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये रावणाची वेशभूषा पाहून तो मोगल शासकांप्रमाणे दिसत असल्यावरून सामाजिक माध्यमांतून त्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मिश्रा यांनी वरील चेतावणी दिली आहे.

१. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले की, मी चित्रपटाचा टिझर पाहिला. चित्रपटात आक्षेपार्ह दृश्ये आहेत. आमच्या श्रद्धास्थानांना ज्या प्रकारे दाखवण्यात आले आहे, ते योग्य नाही. श्री हनुमानाचे वस्त्र चामड्याचे दाखवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात हनुमंताचे वर्णन वेगळे आहे. त्यात त्यांची वेशभूषा सांगितलेली आहे. अशा प्रकारे केलेला पालट आमच्या आस्थेवर आघात आहे. धार्मिक भावना दुखावणारे आहे.

२. हिंदू महासभेचे अध्यक्ष चक्रपाणि महाराज यांनी म्हटले की, आमच्या धार्मिक आदर्शांच्या चरित्रामध्ये केलेले पालट स्वीकारले जाणार नाहीत.

३. भाजपच्या प्रवक्त्या मालविका यांनी टीका करतांना म्हटले की, आदिपुरुष चित्रपटात रामायण चुकीचे पद्धतीने दाखवण्यात येत आहे. चित्रपटात रावणाला ज्या प्रकारे दाखवण्यात आले आहे, ते चुकीचे आहे.