‘एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी माझ्या मिरज येथील उपाहारगृहाला भेट दिली. त्याआधी आठ दिवस मला ‘गुरुमाऊलींची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) भेट व्हावी’, असे वाटत होते.
१. व्यवसायाच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज आणि अन्य देवता यांची पूजा करतांना गुरुमाऊलींच्या भेटीची तीव्र इच्छा मनात उत्पन्न होणे
आमचे मिरज येथे ‘स्वामी समर्थ इडली, वडा आणि डोसा सेंटर’ या नावाचे उपाहारगृह आहे. ते काही कारणास्तव मिरज येथेच नवीन ठिकाणी स्थलांतरित केले. श्री स्वामी समर्थ आणि गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय नवीन जागेतही सुरळीत चालू झाला. व्यवसायाच्या ठिकाणी मी प्रतिदिन सकाळी श्री स्वामी समर्थ महाराज आणि अन्य देवता यांची पूजा करतो. थंडीचे प्रमाण वाढल्याने आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला ३ दिवस पूजेसाठी जाता आले नाही. त्यानंतर मी तिकडे जाऊन पूजा करू लागलो. पूजन चालू केल्यानंतर माझ्याकडून प.पू. भक्तराज महाराज विरचित ‘या गुरुराया मम मंदिरा…’ या भजनपंक्ती आपोआप म्हटल्या जात होत्या. माझ्या मनात ‘गुरुमाऊलींची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) भेट व्हावी’, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली.
त्यानंतर ३ दिवसांनी मी रात्री दूरचित्रवाणीवर ‘श्री स्वामी समर्थ’ यांच्याविषयी मालिका पहात होतो. त्यात ‘एका प्रसंगात स्वामी भक्तांना म्हणतात, ‘‘जेथे प्रामाणिकपणा आहे, तेथे मी आहे. माझे अस्तित्व आहे.’’ हे ऐकून माझ्या मनात पुन्हा गुरुमाऊलींच्या भेटीची ओढ वाढली. दुसर्या दिवशी श्री स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करतांना माझ्या मनात विचार आला, ‘महाराज, खरेच मी प्रामाणिकपणे आपली सेवा करत असेन, तर आपण मला निश्चितच भेटाल.’
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा लाभलेला सत्संग !
२ अ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ साधकाच्या घरी आल्यावर त्याचे मन स्थिर होणे : त्यानंतर तिसर्या दिवशी सकाळी मिरज आश्रमातील श्री. योगेश जोशी यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आश्रमात आल्या आहेत.’’ मी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना भेटलो. मी मिरज आश्रमाच्या शेजारीच रहात असल्याने त्या आमच्या घरी आल्या. तेव्हा माझे मन अतिशय स्थिर झाले. ‘त्यांच्याशी काय बोलावे ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. केवळ त्या बोलत होत्या आणि आम्ही ऐकत होतो. त्यांच्या अनुमाने २० ते २५ मिनिटांच्या भेटीत मी पूर्वी गोवा येथील सुखसागर येथे काही वर्षे केलेल्या सेवांसंबंधीचे क्षण माझ्या दृष्टीपुढे उभे राहिले.
२ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी उपाहारगृहाला ‘प्रसादगृह’ म्हणण्यास सांगणे : त्या वेळी मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना म्हणालो, ‘‘आम्ही उपाहारगृह चालू केले असून ‘ते हिंदु राष्ट्रातील एक आदर्श उपाहारगृह व्हावे’, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी आपण त्याला भेट देणार का ? तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा.’’ त्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘आपले म्हटल्यावर त्याला उपाहारगृह नाही, तर ‘प्रसादगृह’ म्हणायचे.’’
२ इ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘तुमची अन्नपूर्णायोगातून साधना चालू आहे आणि तुम्ही हिंदु राष्ट्रातील एक सात्त्विक ठिकाण निर्माण केले आहे’, असे सांगणे : त्यानंतर आम्ही सर्व जण प्रसादगृहात गेलो. तेथे गेल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सर्वत्र फिरून पाहिले. त्या म्हणाल्या, ‘‘इतरांची साधना गुरुकृपायोगातून आहे, तर तुमची साधना अन्नपूर्णायोगातून आहे. तुम्ही हिंदु राष्ट्रातील एक सात्त्विक ठिकाण निर्माण केले आहे.’’ या वेळी त्यांच्या समवेत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी होते.
माझी ‘श्री स्वामी समर्थ आणि गुरुमाऊली’ यांच्या भेटीची इच्छा त्यांनी अशा पद्धतीने संत, सद्गुरु आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या दर्शनाने पूर्ण केली. त्याबद्दल सर्वांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. नितीन काशीनाथ कुलकर्णी, मिरज (१०.२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |