भारतातील राज्यांमध्ये प्रवास न करण्याची कॅनडा सरकारची त्यांच्या नागरिकांना सूचना

काही दिवसांपूर्वी भारताने कॅनडातील भारतियांना अशा प्रकारची केली होती सूचना !

ओटावा (कॅनडा) – कॅनडा सरकारने भारतात येणार्‍या कॅनडाच्या नागरिकांना काही राज्यांची सूची दिली आहे. यात पंजाब, राजस्थान, गुजरात, आसाम आणि मणीपूर यांचा समावेश आहे. ‘या राज्यांमध्ये कॅनडाच्या नागरिकांनी प्रवास करू नये’, अशी सूचना  कॅनडा सरकारने त्यांच्या नागरिकांना दिली आहे. यासाठी सुरक्षेचे कारण देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कॅनडात घडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवरील आक्रमणाच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर भारतानेही कॅनडामधील भारतियांनाही कॅनडातील काही राज्यांत न जाण्याची सूचना दिली होती. त्यानंतर आता कॅनडाने त्याच्या नागरिकांना भारताविषयी सूचना दिली आहे.

१. कॅनडाने म्हटले आहे की, भारतातील पाकिस्तानच्या सीमेवरील राज्यांमध्ये प्रवास करणे टाळावे. सीमाभागापासून १० किलोमीटरच्या परिसरात फिरू नये. या भागातील सुरक्षेविषयीची अनिश्‍चितता आणि भूसुरूंगांची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी.

२. भारताने पूर्वी दिलेल्या सूचनेत म्हटले होते की, गेल्या काही दिवसांमध्ये कॅनडाममध्ये द्वेषातून होणारे गुन्हे, सामाजिक हिंसाचार आणि भारतियांविरोधातील कारवायांमध्ये वाढ झाली आहे. भारत सरकार आणि कॅनडातील भारतीय दूतावासाने या घटनांची नोंद घेऊन कॅनडा सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर कॅनडातील भारतीय नागरिक, विद्यार्थी आणि कॅनडात जाण्याच्या सिद्धतेत असलेल्या भारतियांनी सतर्क रहावे.

संपादकीय भूमिका

भारताने सूचना केल्यामुळेच आता कॅनडाने त्याच्या नागरिकांना ही सूचना केल्याचे लक्षात येते ! अन्य देश भारताला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात, तर भारत गांधीगिरी दाखवण्यात धन्यता मानतो, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. तो आता पालटण्याची आवश्यकता आहे !