‘पी.एफ्.आय.’वरील बंदीसाठी केंद्रशासनासह राष्ट्रवादी नागरिक आणि संघटना यांचेही अभिनंदन ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, भारत माता की जय संघ

पणजी, २८ सप्टेंबर (पत्रक) – सर्वप्रथम माननीय मोदीजी यांच्या केंद्रशासनाने देशघातकी आतंकवादी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पी.एफ्.आय.)’ या संघटनेवर घातलेल्या बंदीचे ‘भारतमाता की जय संघ, गोवा’ सहर्ष स्वागत करत आहे, तसेच या संघटनेविरुद्ध आणि ‘सर तन से जुदा’सारख्या (शिर धडापासून वेगळे करण्यासारख्या) धमक्यांना भीक न घालता सातत्याने गेली कित्येक वर्षे बुलंद आवाज उठवणारे राष्ट्रवादी नागरिक अन् संघटना यांचे हार्दिक अभिनंदन करत आहे.

श्री. सुभाष वेलिंगकर, भारत माता की जय संघ, पोंडा-गोवा

आता गोवा शासनाने गोमंतकियांच्या सुरक्षेकरता या आतंकवादी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सक्रीय कार्यकर्ते यांना तातडीने अटक करावी आणि कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा विवशता यांना बळी न पडता त्यांच्या येथील कारस्थानांबद्दल सखोल चौकशी करावी, अशी भारतमाता की जय संघाची मागणी आहे. आम्ही या गोष्टींकडेही लक्ष वेधू इच्छितो की, ‘पी.एफ्.आय.’ने देशात रक्तपात,‘सर तन से जुदा’ कारवाया, दंगली, हिजाबसारखी आंदोलने, हिंदु नेत्यांना ठार मारणे यांसारखी अनंत कारस्थाने केली. ‘पी.एफ्.आय.’शी संबंधित असलेल्यांची पाळेमुळे खणून न काढल्यास, हे लोक अन्य दुसरे नाव धारण करून सामाजिक कार्याचा बुरखा चढवतील आणि त्या बुरख्याआड पुन्हा देशविरोधी कारवाया चालू करतील, हे लक्षात घ्यावे लागेल.

रुमडामळ पंचायतीत ‘पी.एफ्.आय.’च्या सक्रीय कार्यकर्त्याचा दुर्दैवी प्रवेश झाला आहे. त्याची गंभीर नोंद सरकारने घ्यावी, असा आमचा आग्रह आहे. ही कीड गोव्याच्या राजकारणात मागील दाराने आणि राजकीय पाठिंब्याने पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल.

गोव्यात अवैधरित्या घुसलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी यांनी मतदानावरही प्रभाव निर्माण केला आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी डिचोली, मडगाव आणि वास्को येथे झालेल्या सभांतून राजकीय नेत्यांनी रोहिंग्याना उघडपणे पाठिंबा दर्शवून ‘त्यांना गोव्यात आसरा मिळालाच पाहिजे’, ही मागणी केली होती.

वृत्तपत्रात या बातम्या छापूनही आल्या आहेत. सरकारने या गोष्टींची निष्पक्षपणे चौकशी करावी.

‘पी.एफ्.आय.’ची राजकीय शाखा ‘एस्.डी.पी.आय.’ (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) ही गोव्यातही फातोर्डा येथे स्थापन झालेली आहे. देशद्रोही कृत्यांतही हा पक्ष सामील असल्याचे पुरावे आहेत. गोव्यात शाखा स्थापन होण्याच्या वेळी जमलेल्या जमावाने ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेला आहे. सरकारने त्यांचीही सखोल चौकशी करून त्यांना कह्यात घ्यावे, असे आम्हाला वाटते.