मडगाव, २८ सप्टेंबर (वार्ता.)- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देशव्यापी संघटनेवर बंदी घातल्यानंतर गोव्यात या संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते यांची धरपकड चालू झाली असून दक्षिण गोव्यात आतापर्यंत २९ जणांना कह्यात घेण्यात आल्याचे समजते. यासंबंधी दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांना विचारले असता ‘आम्ही अद्याप कुणालाही अटक केलेली नाही; पण प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत’, असे त्यांनी सांगितले.
(सौजन्य : Unique Goa अदभुत गोवा)
यासंबंधी ते म्हणाले,
‘‘गोव्यात पी.एफ्.आय.(पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या संघटनेचे कार्य करतांना कुणी आढळल्यास त्या संघटनेतील सदस्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. या संघटनेच्या सदस्यांवर आम्ही लक्ष ठेवले आहे.’’ मिळालेल्या माहितीनुसार मायणा कुडतरी पोलिसांनी रुमडामळ येथील वादग्रस्त पंच उम्रान पठाण याला २८ सप्टेंबरला दुपारी कह्यात घेतले आहे. पी.एफ्.आय.चे गोवा प्रमुख शेख अब्दुल रौफ यांनाही पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. फातोर्डा भागात कार्यरत असलेला पी.एफ्.आय.चा नेता शेख मुझफ्फर यालाही मडगाव पोलिसांनी कह्यात घेतले आहे.