भोगवादी संस्कृती नको !

पुणे येथील पबमध्ये गर्दी वाढवण्यासाठी पबचालकांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘पार्टी फिलर’, म्हणजेच पबमध्ये आलेल्या तरुणांना गर्दी दिसावी, यासाठी वापर केला जात आहे. काही शिक्षण संस्थेत पबचालकांनी विद्यार्थी पबमध्ये यावेत म्हणून काही ‘एजंट’ (दलाल) नेमले आहेत. ते ‘एजंट’ विद्यार्थ्यांना पबमध्ये केवळ २०० रुपयांमध्ये प्रवेश देतात. विद्यार्थ्यांनाही ही रक्कम स्वखर्चासाठी चालणारी असते. त्यांना आकर्षित करण्यासाठी पबकडून विविध सवलतीही देण्यात येतात, तसेच पार्टीची रंगत वाढवण्यासाठी तरुणांना नशेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होत आहे.

पुणे विद्येचे माहेरघर ! येथे उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जात असल्यामुळे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातूनच नाही, तर देश-विदेशातून येतात. सांस्कृतिक वारसा असणार्‍या पुण्यात असे अपप्रकार घडणे, हे गंभीर, संतापजनक आणि चिंताजनक आहे. पुण्यात सध्या पबची विकृती वाढत आहे. पब, नाईट क्लब यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकृत्ये, तसेच अनेक अवैध धंदे चालतात. पुणे शहरात अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पब चालू असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. मुळात असे अवैध पब कुणाच्या संगनमताने चालतात ? संबंधितांवर कारवाई का होत नाही ? महाविद्यालयात एजंट कुणाच्या अनुमतीने प्रवेश करतात ? तरुण पिढी नशेच्या अधीन झाल्याने त्यांच्यासह त्यांच्या पालकांचेही जीवन उद्ध्वस्त होते, याचे दायित्व कोण घेणार ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. अजून कोणत्या अन्य चुकीच्या गोष्टींसाठी या तरुणांचा वापर होत आहे ? याचेही अन्वेषण करणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी हेच देशाचे भवितव्य आणि तेच भावी पिढीचे आदर्श असणार आहेत. त्यांना नशेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार जाणूनबुजून होत आहे का ? हे पहाणे आवश्यक आहे. अवैध पब चालू ठेवणारे, तसेच त्यावर अंकुश न ठेवणारे कामचुकार आणि भ्रष्ट पोलीस दोघेही त्यास तितकेच उत्तरदायी आहेत.

प्रलोभनांना बळी पडून अशा विकृतींच्या मागे धावणार्‍या तरुण पिढीवर अंकुश ठेवायचा असेल, तर आज त्यांना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणात आकंठ बुडालेल्या तरुणांना त्याचे दुष्परिणाम सांगून त्यांना सावध करायला हवे, तसेच त्यांना भोगी आणि व्यसनी बनवणारी विकृती नव्हे, तर त्याग शिकवणारी भारतीय संस्कृती आत्मसात् करायला शिकवायला हवी.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे