पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांवर त्यांच्या सहभागानुसार कारवाई होईल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

मुंबई – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हा एक ‘सायलेंट किलर’ (हळूहळू ठार मारणारा) होता. महाराष्ट्रातही काही लोकांनी विविध ठिकाणी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता. एक मानवी मुखवटा दाखवायचा आणि पाठीपागून वेगळे कृत्य करणारे हे लोक होते. यामध्ये वेगवेगळे लोक सहभागी आहेत. त्यांच्या सहभागानुसार कारवाई करण्यात येईल, असे वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविषयी गुप्तचर संस्थेला माहिती मिळत होती. समाजामध्ये हिंसाचार घडवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. आतंकवादी कारवाया करून ही मंडळी देशाचे वातावरण बिघडवत आहेत. देशात तेढ निर्माण करण्याचे काम करणार्‍यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आहे.’’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंदीविषयी बोलणे मूर्खपणाचे !

काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाप्रमाणे एकतरी कृत्य केले आहे का ? त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याविषयी बोलणे मूर्खपणाचे आहे. ज्यांच्याकडे अक्कल अल्प आहे, त्यांच्याविषयी मी बोलणार नाही.’’