‘नासा’ची  पृथ्वीला वाचवण्याची ऐतिहासिक चाचणी यशस्वी !

नासाचे यान लघुग्रहाशी धडकले !

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे यान अंतराळात पृथ्वीपासून ११० लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘डायमॉर्फस’ नावाच्या लघुग्रहाला धडकले. ‘नासा’ने प्रथमच ‘प्लॅनेटरी डिफेन्स टेस्ट’ (डार्ट) योजना यशस्वीरित्या पूर्ण केली. यामुळे आता भविष्यात पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचे लघुग्रह आदळण्याची शक्यता निर्माण झाली, तर हे तंत्रज्ञान पृथ्वीला वाचवू शकते.

याविषयी माहिती देतांना ‘नासा’ने सांगितले की, २७ सप्टेंबरला पहाटे ४.४५ मिनिटांनी अंतराळ यानाची ‘डायमॉर्फस’ या लघुग्रहाशी टक्कर झाली. टक्कर झाल्यानंतर डायमॉर्फस कोणत्या दिशेने वळले, याची माहिती मिळण्यास वेळ लागेल. यामागचा उद्देश तो लघुग्रह नष्ट करणे, हा नसून त्याची कक्षा पालटणे, हा आहे.

काय आहे ‘डायमॉर्फस’ ?

‘डायमॉर्फस’ हा ‘बायनरी स्टिरॉइड’ प्रणालीचा भाग आहे. या प्रणालीमध्ये दोन लघुग्रह असतात, ज्यामध्ये एक लहान लघुग्रह मोठ्या लघुग्रहाभोवती फिरत असतो. ‘डायमॉर्फस’ आणि ‘डिडमॉस’ असे हे दोन लघुग्रह आहेत. यात ‘डायमॉर्फस’ या लघुग्रह त्याच्यापेक्षा मोठ्या असणार्‍या ‘डिडमॉस’च्या भोवती फिरत असतो. या दोघांमधील अंतर केवळ १.२ कि.मी. इतके आहे.