नागपूर येथील गरबा उत्सवात केवळ हिंदूंनांच प्रवेश द्या ! – विश्‍व हिंदु परिषदेची मागणी

नागपूर – नवरात्र-गरबा उत्सवात आधार कार्ड पडताळूनच प्रत्येकाला मंडपात प्रवेश द्यावा, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेकडून २६ सप्टेंबर या दिवशी करण्यात आली. ‘लव्ह-जिहाद’सारख्या घटना टाळायच्या असतील, तर आताच काळजी घ्यायला हवी, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे विदर्भ प्रांत प्रमुख गोविंद शेंडे यांनी केले.

गोविंद शेंडे म्हणाले, ‘‘गरबा उत्सवात श्रद्धा नसतांनाही इतर धर्मातील अनेक तरुण मुले प्रवेश करून हिंदु महिला आणि तरुणी यांची छेड काढतात. पुढे ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्या निर्माण होतात. गरबा उत्सव हा श्रद्धा आणि उपासना यांच्याशी निगडित विषय आहे. तो सार्वजनिक करमणुकीचा (इव्हेंटचा) प्रकार नाही. त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी केवळ हिंदु धर्मियांना प्रवेश दिला जावा. त्यासाठी प्रत्येकाचे आधारकार्ड पडताळले जावे, अशी सूचना विश्‍व हिंदु परिषदेने गरबा उत्सवांचे आयोजन करणार्‍यांना मंडळांना केली आहे.’’

विहिंपचे कार्यकर्ते उत्सव स्थळी उभे राहून मंडळांना सहकार्य करतील !

ते म्हणाले, ‘‘या संदर्भात विश्‍व हिंदु परिषदेने विदर्भात अनेक ठिकाणी गरबा आयोजन करणार्‍या मंडळांची भेट घेतली आहे, तसेच आम्ही पोलीस अधिकार्‍यांनाही भेटून याची माहिती देण्यात येणार आहोत. आवश्यकता भासल्यास विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते गरबा उत्सव आयोजन स्थळी उभे राहून मंडळांना साहाय्य करतील. आयोजन मंडळ आणि पोलीस यांनी यात पुढाकार घ्यावा.’’