पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या महसा अमिनी यांची बातमी देणार्‍या महिला पत्रकाराला अटक

इराणमधील हिजाब प्रकरण

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र !)

तेहरान (इराण) – इराणमध्ये हिजाबच्या प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या महसा अमिनी यांच्या मृत्यूची बातमी पहिल्यांदा देणारी महिला पत्रकार नीलोफर यांना अटक करण्यात आली. नीलोफरचे अधिवक्ता महंमद अली कामफिरौजी यांनी ही माहिती दिली. ‘शार्ग’ या दैनिकात नीलोफर काम करतात. नीलोफर यांचे ट्विटर खातेही त्यांच्या अटकेपूर्वी बंद करण्यात आले. इराण प्रशासनाच्या सांगण्यावरून ते बंद करण्यात आले.

महंमद अली यांनी ट्वीट करून याविषयी माहिती देतांना सांगितले की, इराणच्या सुरक्षादलांनी नीलोफर यांच्या घरी धाड टाकून त्यांना अटक केली. घराची झडती घेण्यात आली. काही साहित्य जप्त करण्यात आले. ‘आतापर्यंत नीलोफर यांच्यावर कोणते आरोप लावण्यात आले आहेत ?’, हे समजू शकलेले नाही.

संपादकीय भूमिका

इराण सरकारची दडपशाही ! अशा दडपशाहीतून आंदोलन अधिक तीव्र होते, हे सरकारने लक्षात ठेवायला हवे !