पाकिस्तानात विवाहित हिंदु महिला आणि २ अल्पवयीन मुली यांचे अपहरण

दोघींचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांचे मुसलमानांशी लावून दिले लग्न !

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातून एक हिंदु महिला आणि २ अल्पवयीन मुली यांचे अपहरण करण्यात आले आहे. यांपैकी दोघींचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांचे मुसलमान पुरुषांशी लग्न लावून देण्यात आले आहे.

१. मीना मेघवार या १४ वर्षीय मुलीचे नसरपूर भागातून अपहरण करण्यात आले , तर मीरपूरखास शहरातील बाजारातून घरी परतत असतांना अन्य एका हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले. त्याच वेळी मीरपूरखास येथील एक विवाहित हिंदु महिला अचानक गायब झाली. तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करून मुसलमान पुरुषाशी लग्न लावून देण्यात आल्याचे नंतर उघडकीस आले. ही हिंदु महिला ३ मुलांची आई असल्याचे सांगण्यात येत आहे.

२. मीरपूरखासमधील एका पोलीस अधिकारी म्हणाला, ‘‘तिन्ही प्रकरणांचे अन्वेषण चालू आहे. विवाहित महिलेचा दावा आहे की, तिने स्वतःच्या इच्छेने धर्मांतर करून मुसलमान पुरुषाशी लग्न केले.’’

३. या प्रकरणी महिलेचा पती रवि कुर्मी यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली; परंतु पोलिसांनी ती प्रविष्ट करून घेण्यास नकार दिला. (भारतातील आणि पाकमधील पोलीस हिंदूंच्या संदर्भात सारखेच वागतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) रवि कुर्मी म्हणाले, ‘‘आमच्या शेजारी रहाणारा अहमद चंडियो हा माझ्या पत्नीला त्रास देत होता. नंतर त्यानेच तिचे अपहरण करून धर्मांतर केले.’’

संपादकीय भूमिका

पाकिस्तानमध्ये अशा घटना नवीन नाहीत; मात्र यावर भारतातील आणि जगभरातील हिंदू निष्क्रीय रहातात, हेही तितकेच खरे ! हे हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना लज्जास्पद !