पुढील दोन वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी संकटाची ठरू शकतात ! – अमेरिकेतील अर्थतज्ञ रुबिनी यांचे भाकित

वर्ष २००८ मधील आर्थिक मंदीचेही वर्तवले होते अचूक भाकित !

डावीकडे अर्थतज्ञ रुबिनी

न्यूयॉर्क (अमेरिका) – पुढील २ वर्षे ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी संकटाची ठरू शकतात. चालू वर्षाच्या अंतापर्यंत अमेरिका, तसेच जगातील इतर अर्थव्यवस्थांमध्ये  भीषण आर्थिक मंदी येऊ शकते. आर्थिक संकटाचा हा काळ जवळपास वर्षभर, म्हणजे वर्ष २०२३ च्या अंतापर्यंत राहू शकतो, असे भाकित जगप्रसिद्ध अमेरिकी अर्थतज्ञ नॉरियल रुबिनी यांनी वर्तवले आहे. नॉरियल रुबिनी यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना हे भाकित केले. रुबिनी यांनी गुंतवणूकदरांना ‘तुमच्याकडे अधिक रोख रकम असली पाहिजे’, असेही म्हटले आहे. रुबिनी यांनी वर्ष २००८ मधील आर्थिक मंदीचेही अचूक भाकित वर्तवले होते. त्यामुळे त्यांच्या या नव्या भाकितामुळे जगभरात भीती निर्माण झाली आहे.

रुबिनी यांनी हे नवे आर्थिक संकट गांभीर्याने न घेणार्‍या देशांनाही चेतावणी दिली आहे. ते म्हणाले की, ज्या देशांना ‘आम्हाला या आर्थिक मंदीचा फटका फारसा बसणार नाही’, असे वाटत आहे, त्यांनी वेगवेगळी सरकारे आणि संस्था यांच्यावर असलेल्या कर्जांचे ओझे पहावे. भविष्यात कर्जदर वाढतील तसा त्याचा फटका संस्था, सर्वसामान्य नागरिक आणि बँक यांना बसेल.

महागाईचा भडका उडेल !

रुबिनी पुढे म्हणाले की, आगामी आर्थिक संकटामुळे महागाईचा भडका उडेल. अमेरिकेत महागाईचा दर अल्प करणे अशक्य होऊ शकते. कठोर निर्णय न घेतल्यास महागाईचा दर २ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य गाठणे अशक्यप्राय गोष्ट असेल.