|
मुंबई – अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. पुणे येथील ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात लाखो रुपये खर्च केल्याप्रकरणी तत्कालीन संचालकांना १० लाख ७८ सहस्र रुपये भरण्याचे आदेश दिले. यात महामंडळाचे आजी आणि माजी पदाधिकारी, तसेच माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, अलका कुबल, प्रिया बेर्डे, तसेच विजय कोंडके, मिलिंद अष्टेकर, सतीश बिडकर, सुभाष भुरके, अनिल निकम, संजीव नाईक, सतीश रणदिवे, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती आणि व्यवस्थापक रवींद्र बोरगांवकर यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात ५२ लाख रुपये बोगस म्हणून खर्च करण्यात आल्याचा आरोप संचालकांवर करण्यात आला होता. सर्वसाधारण सभेत या खर्चाला मान्यता मागितली असता याला सभासदांनी आक्षेप घेतला होता. ‘जे खर्च चुकीच्या पद्धतीने झाले आहेत, त्याची वसुली झाली पाहिजे’, अशी मागणी या वेळी केली होती. धर्मादाय आयुक्तांनी १० लाख ७८ सहस्र रुपये तातडीने भरण्याचा आदेश दिला; पण याला संबंधित संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते; पण त्यांची याचिका फेटाळून लावत ती रक्कम ६ आठवड्यांत भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याने महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अनेक संचालकांचे सभासदत्व रहित केले आहे. पैशांसाठी १ आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. पैसे भरल्यानंतर पुढील सुनावणी होईल.