वारंगळ (तेलंगाणा) येथील ३ मंदिरांनी प्रत्येक १ कोटी रुपये द्यावे !

स्वतःच्या कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी धर्मादाय विभागाचा आदेश !

वारंगळ (तेलंगाणा) – तेलंगण राज्यातील धर्मादाय विभागाने त्याच्या वारंगळ येथील ३ मजली कार्यालयाच्या बांधकामासाठी ३ मंदिरांना प्रत्येकी १ कोटी रुपये देण्यास सांगितले आहे. या विभागाचे अतिरिक्त आयुक्त ई. श्रीनिवास राव यांनी ही मागणी केली आहे. वारंगळमधील भद्रकाली मंदिर, काजीपेट टाऊन येथील मदिकोंडा गावातील श्री सीतारामचंद्र स्वामी मंदिर आणि मुलुगु जिल्ह्यातील मेदारम गावातील सम्मक्का-सरलम्मा जतारा या मंदिरांचा यात समावेश आहे. या तिघांना विभागाच्या नावाने संयुक्त बँक खाते उघडून त्यात पैसे जमा करण्यास सांगितले आहे. या मागणीचा भद्रकाली मंदिराच्या सेवा समितीचे बी. सुनील आणि बी. वीरन्ना यांनी विरोध केला आहे. तसेच मेट्टू गुट्टा विकास समितीच्या सदस्यांनीही याचा विरोध केला आहे.


वारंगळमधील भद्रकाली मंदिर प्रसिद्ध आहे. हे प्राचीन मंदिर असून मुसलमान आक्रमकांकडून त्याची लूटमार करण्यासह तोडफोड करण्यात आली होती. वर्ष १९५० मध्ये याचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराला आता दक्षिण भारतातील सुवर्ण मंदिराच्या रूपात ओळखले जाते.

संपादकीय भूमिका

  • मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! या आदेशाचा हिंदूंनी वैध मार्गाने संघटित होऊन विरोध करणे आवश्यक आहे !
  • धर्मादाय विभागाची तुघलकी मागणी ! कुठे मंदिरांना निधी देणारे पूर्वी हिंदु राजे, तर कुठे मंदिरांकडे निधी मागणारे आताचे निधर्मी शासनकर्ते !