आवश्यकता आहे सुसंस्कारांची !

पिंपरी-चिंचवड शहरात (जिल्हा पुणे) गेल्या ६ मासांत २४२ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाली आहेत. पोलीस अन्वेषणामध्ये मुले बेपत्ता होण्यामागील विविध कारणे समोर येत आहेत. त्यामध्ये पालकांची शिस्त, अभ्यासासाठी दबाव, सतत होणारे घरातील वाद, बाह्य जगाचे आकर्षण, शिक्षणाची भीती, सामाजिक माध्यमांद्वारे (‘सोशल मिडिया’द्वारे) चित्रपटात रंगवलेले आभासी जग आणि प्रेमप्रकरण अशी प्रमुख कारणे मुलांनी घर सोडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे अन्वेषणामध्ये स्पष्ट झाले आहे.

ही कारणे पाहिल्यावर ज्या वयात शिक्षण घेणे, आई-वडिलांचे ऐकून त्याप्रमाणे आचरण करणे, यांकडे लक्ष देण्याऐवजी मनाने निर्णय घेऊन घर सोडणे, हे किती भयावह आहे. अन्य कारणांमध्ये सामाजिक माध्यमांतून मुले-मुली सतत एकमेकांच्या संपर्कात असल्याने प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात अडकतात आणि चुकीचे पाऊल उचलतात, हेही वास्तव पोलीस अन्वेषणात समोर आले आहे. त्यासोबतच काही किरकोळ कारणांमुळे मुले घर सोडून जातात, असेही प्रकार घडले आहेत. अशी स्वार्थी, आत्मकेंद्रित झालेली मुले कुटुंबाचाही विचार करत नसतील, तर ती मुले राष्ट्राचा विचार करू शकतील का ? हे भीषण सत्य येथे अधोरेखित होते. कुठे स्वातंत्र्यासाठी घरदार आणि कुटुंब यांचा त्याग करणारी पिढी अन् कुठे स्वार्थासाठी कुटुंबाचा त्याग करून वडीलधार्‍यांना त्रास देणारी सध्याची पिढी !

हे सर्व पाहिल्यानंतर मुलांवर संस्कार करणे किती आवश्यक आहे ? हे लक्षात येते. यामध्ये सध्याची शिक्षणपद्धत, एकत्र कुटुंबपद्धतीचा अभाव, पाश्चात्त्य विकृतीचा वाढता प्रभाव या गोष्टीही मुले बिघडण्यास कारणीभूत ठरत आहेत. यामुळे मुले भरकटली आहेत. खरेतर या युवाशक्तीच्या बळावरच भारत विश्वशक्ती बनू शकतो. त्यामुळेच आज आवश्यकता आहे ती या युवाशक्तीला सुसंस्कारित करण्याची ! आजच्या पिढीने पाश्चात्त्यांचे अंधानुकरण सोडून आपला गौरवशाली इतिहास, परंपरा आणि संस्कृती यांचे अनुकरण केल्यास त्यांना योग्य दिशा मिळेल. राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती मुलांच्या मनात प्रेम निर्माण होईल. त्या वेळेस ते कोणत्याही प्रलोभनांना बळी पडणार नाहीत आणि चुकीच्या गोष्टींमुळे भरकटणार नाहीत. हिंदु राष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमामध्ये धर्मशिक्षण असल्यामुळे मुलांवर लहानपणापासूनच योग्य संस्कार होणार आहेत. त्यामुळे सर्व समस्यांचे उत्तर ‘हिंदु राष्ट्र’ आहे, हे नक्की !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे