काँग्रेसचा बुरखा फाडणारी तिची ‘भारत जोडो’ यात्रा !

१. काँग्रेसच्या यात्रेला ‘भारत जोडो’ नावाऐवजी ‘काँग्रेस जोडो’ हे नाव अधिक शोभून दिसणे

‘स्वत:ला पुनर्जीवित करण्यासाठी काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत १४५ दिवसांच्या यात्रेवर निघाली आहे आणि या यात्रेला ‘भारत जोडो यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. येथूनच खर्‍या विडंबनेला प्रारंभ होतो. ‘दिवसेंदिवस विखरत जाणार्‍या काँग्रेसला नवीन संजीवनी देणे आणि या निमित्ताने पुन्हा एकदा राहुल गांधी यांना पुढे आणणे’, हा या यात्रेचा उद्देश आहे. या यात्रेचे नाव ‘भारत जोडो’ असण्याऐवजी ‘काँग्रेस जोडो’ असे असते, तर योग्य झाले असते. ‘काँग्रेसला भारताशी जोडा’, ही घोषणा असती, तरी थोडे चालले असते. काँग्रेस पक्षाची ही यात्रा कुठून, काय आणि किती जोडू शकते ? हे तर काळच सांगू शकेल; परंतु मागील काही दिवसांमध्ये या यात्रेने काँग्रेसचे खरे स्वरूप निश्चितच उघड केले आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पूर्णपणे हिंदू आणि सनातन संस्कृती यांची विरोधक बनली आहे. यात ‘टुकडे टुकडे’ टोळी आणि ‘हम लेकर रहेंगे आझादी’ अशा देशविरोधी घोषणा देणार्‍या लोकांचाही सहभाग आहे.

२. ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवण्याचे राहुल गांधी यांचे दिवास्वप्न !

या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवण्याचे दिवास्वप्न पहात आहेत. ‘भारत जोडो’ ही घोषणा देऊन यात्रेवर निघालेली राहुल गांधींची काँग्रेस एका ‘ट्वीट’च्या माध्यमातून संघाला १४५ दिवसांमध्ये जाळून भस्म करण्याची भविष्यवाणी करत आहे. राहुल गांधी पूर्णत: हे विसरले की, स्व. जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यापर्यंत सर्व ‘सेक्युलर’ (निधर्मी) नेते संघाला संपवण्याचे स्वप्न पहात आले आहेत; परंतु स्वयंसेवकांचे कठोर कष्ट आणि राष्ट्रवादी विचारसरणी यांच्या बळावर संघ आज एक विशाल वटवृक्ष बनला आहे, जो राहुल गांधींच्या १४५ दिवसांच्या यात्रेच्या समारोपानंतरही तसाच उभा राहील.

यात्रेच्या ५ व्या दिवशी काँग्रेसने एक चित्र ‘ट्वीट’ केले आणि लिहिले, ‘भारताला द्वेषाच्या साखळ्यांपासून मुक्त करण्यासाठी अन् भाजप-संघ यांच्याकडून झालेल्या हानीची भरपाई करण्यासाठी आम्ही एक एक पाऊल पुढे जात आहोत.’ त्यापुढे ‘१४५ दिवस’ असे लिहून त्यासमवेत जोडलेल्या चित्रात ‘संघाच्या गणवेशातील खाकी चड्डीला आग लागली असून त्यातून धूर निघत आहे’, असे दाखवले आहे. आता खाकी चड्डी हा संघाचा गणवेश राहिलेला नाही; परंतु काँग्रेसचा उद्देश स्पष्ट झाला आहे. त्यानंतर रा.स्व. संघ आणि काँग्रेस यांच्यातील वाद अधिकच गडद झाला आहे.

राहुल गांधींनी केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने संघावर अशा प्रकारचे आक्षेपार्ह ‘ट्वीट’ केले आहे. या माध्यमातून राहुल गांधी आणि काँग्रेस यांना केरळच्या कट्टरवादी मुसलमानांना प्रसन्न करायचे आहे, ते दिसून येते. असे करून राहुल गांधी नेहरूंच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. नेहरूंनीही स्वातंत्र्यानंतर लगेच दक्षिण भारतात संघाचे दमन करण्याचे आणि मुस्लिम लीगला पुढे नेण्याचे काम केले होते. त्यांनी तत्कालीन मद्रास प्रांत ज्यात सध्याचे तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ यांचा समावेश होता, त्या मद्रास प्रांताच्या सरकारवर संघावर प्रतिबंध घालण्यासाठी अन् मुस्लिम लीगला मोकळीक देण्यासाठी दबाव निर्माण केला होता. स्वातंत्र्यानंतर ६ मासांतच नेहरूंनी संघाला संपवण्यासाठी षड्यंत्र करणे चालू केले होते.

आज त्यांचेच पणतू राहुल गांधी १४५ दिवसांत संघाला संपवण्याचे स्वप्न पहात आहेत. राहुल गांधींच्या काँग्रेसने ज्या प्रकारे खाकी चड्डीला आग लावण्याचा प्रयत्न केला आहे, वास्तविक तशीच आग काँग्रेस पूर्वीपासून लावत आली आहे. त्यात वर्ष १९८४ च्या शीख दंगलीपासून बिहारची भागलपूर दंगल, उत्तरप्रदेशची मेरठ दंगल यांसारखी अनेक उदाहरणे सापडतील. यात काँग्रेस किती द्वेषाने पछाडली आहे, हे दिसून येते. या देशात द्वेषाचा जो काही धंदा चालू आहे, तो पूर्णत: काँग्रेसच्या गांधी परिवाराच्या नेतृत्वात चालू आहे. ज्यात ‘सिर तन से जुदा’ (डोके शरिरापासून वेगळे करणे) या अभियानाचाही समावेश आहे.

३. यात्रेच्या कालावधीत राहुल गांधी यांनी हिंदु देवीदेवतांचा अवमान करणारे ख्रिस्ती पाद्री जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेणे   

तत्पूर्वी यात्रेच्या कालावधीत राहुल गांधी यांनी तमिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये जॉर्ज पोन्नैया या ख्रिस्ती पाद्र्याची भेट घेतली, जो हिंदु देवतांचा नेहमीच अवमान करत आला आहे. दोघांच्या संवादाचा एक व्हिडिओ प्रसारित (व्हायरल) होत आहे, ज्यात जॉर्ज पोन्नैया ‘येशूच खरा ईश्वर आहे आणि दुर्गादेवीसह अन्य सर्व देवता कनिष्ठ स्तराच्या आहेत’, असे सांगत असल्याचे दिसते. महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीच्या काळात मंदिरांमध्ये जाणारे अन् स्वत:ला दत्तात्रेयांच्या गोत्राचा जानवेधारी ब्राह्मण असल्याचे सांगणारे राहुल गांधी त्याचा अपलाभ फारच लक्ष देऊन ऐकत आहेत.

हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर भाजप आणि संत समाज आक्रमक होणे स्वाभाविक होते. संतांची सर्वांत मोठी संस्था ‘अखिल भारतीय आखाडा परिषदे’ने पाद्रीच्या या सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्यावर कठोर शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. परिषदेचे अध्यक्ष श्री महंत रविंद्र पुरी म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी पाद्रीच्या वक्तव्याचा विरोध केला नाही, हे दु:खदायक आहे. ते जन्मत: ख्रिस्ती असून त्यांच्यात हिंदुत्व नाही, अन्यथा त्यांनी पाद्रीला विरोध केला असता. हिंदु समाज त्यांना निश्चितपणे धडा शिकवेल. येशू सनातन धर्मियांचे ईश्वर असूच शकत नाहीत.’’

४. गांधी परिवार आणि काँग्रेसचे नेते यांच्याकडून नेहमीच हिंदु देवता अन् धर्म यांचा अवमान करण्यात येणे

काँग्रेसच्या नेत्यांकडून हिंदूंच्या भावनांना ठेच पोचवण्याचे प्रकार प्रथमच घडत नाहीत. गांधी परिवाराने अनेक वेळा प्रभु श्रीरामासह हिंदु देवतांचे पुरावे मागितले आहेत. हे तेच गांधी आणि काँग्रेस परिवाराचे नेते आहेत की, जे रामायण आणि महाभारत यांना केवळ एक सामान्य महाकाव्य समजतात. हे तेच काँग्रेसचे नेते आहेत की, ज्यांच्या मार्गदर्शनात कालीदेवीचा अवमान केला जातो. ही तीच काँग्रेसची लोक आहेत की, ज्यांच्या मार्गदर्शनात दिवंगत एम्.एफ्. हुसेनसारखे लोक हिंदु देवीदेवतांची नग्न चित्रे बनवून आणि त्यांची प्रदर्शने लावून अवमान करत असतात. हे तेच राहुल गांधी आहेत, ज्यांनी अलीकडेच हिंदु आणि हिंदुत्व यांवर चर्चा छेडून हिंदु समाजाचे तुकडे करण्याचे घृणास्पद षड्यंत्र रचले होते. राहुल गांधी यांनी ज्या ख्रिस्ती पाद्रीशी संवाद साधला, तो याआधीही द्वेषपूर्ण वक्तव्य करत आला आहे. या पाद्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातही विषारी टीका केली आहे. ‘भारत जोडो’ यात्रेच्या विहंगम मार्गावर दृष्टी टाकली, तर लक्षात येईल की, काँग्रेसचा खरा उद्देश काय आहे !

५. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेची ‘वाद वाढवा’ यात्रेच्या दिशेने वाटचाल !

राहुल गांधी यांची ही यात्रा संपूर्णपणे लांगूलचालनासाठी आहे; कारण राहुल गांधी लोकसभेच्या २० जागा असणार्‍या केरळ राज्यात १८ दिवस रहाणार आहेत; परंतु ८० जागा असणार्‍या उत्तरप्रदेश राज्यात केवळ ४ दिवस यात्रा करणार आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या यात्रेत हिंदूंचे श्रद्धास्थान असणार्‍या अयोध्या, मथुरा आणि काशी यांचा समावेश नाही. यावरून अयोध्येत प्रभु श्रीरामांचे भव्य मंदिर बनत आहे, तसेच मथुरा आणि काशी आंदोलन नवीन बाळसे धरत आहेत, हे काँग्रेसला मान्य होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. गांधी परिवार आणि काँग्रेस यांच्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु समाज अन् सनातन संस्कृती यांच्या विरुद्ध ठासून घृणा भरलेली आहे. त्यांचे मंदिरात जाणे, ही एक दिशाभूल आहे. काँग्रेसची ही यात्रा बेरोजगारी आणि महागाई यांच्या विरोधातील आक्रोश रॅलीने चालू झाली होती अन् आग लावण्यावर थांबली आहे. वास्तविक काँग्रेसची ही यात्रा ‘भारत जोडो’ नाही, तर ‘वाद वाढवा’ यात्रेच्या दिशेने वाटचाल करत आहे.’

– मृत्युंजय दीक्षित (सप्टेंबर २०२२) (साभार : साप्ताहिक ‘हिंदी विवेक’)

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या देवतांचा अवमान, संघाचा द्वेष आणि राष्ट्राचे तुकडे करणार्‍यांचे समर्थन यांद्वारे काँग्रेस भारत कसा जोडणार ?