मोदी यांची परदेशात कोणतीच मालमत्ता नाही ! – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तानी नेत्यांची मात्र विदेशात कोट्यवधींची संपत्ती !

डावीकडून पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. एका भाषणाच्या वेळी ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची देशाबाहेर कोणतीही मालमत्ता नाही; पण आमच्या नेत्यांची मात्र इतर देशांमध्ये कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. या वेळी त्यांनी पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पुन्हा एकदा टीका केली.

खान पुढे म्हणाले की, मला असा एखादा देश सांगा की, ज्या ठिकाणी लोकशाही आहे आणि त्या लोकशाही देशाच्या प्रमुखाची देशासह विदेशात संपत्ती नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी देशाबाहेर कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता आणि व्यवसाय उभारले आहेत, याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. त्यांच्या मुलांकडे युनायटेड किंगडमचे पारपत्र (पासपोर्ट) आहेत. हे अंतर तेव्हाच निर्माण होते, जेव्हा बलवानांसाठी वेगळा कायदा आणि दुर्बलांसाठी वेगळा कायदा केला जातो.

याआधीही इम्रान खान यांनी भारताचे कौतुक केले आहे. काही मासांपूर्वी ते म्हणाले होते की, आपल्यासमवेत भारत स्वतंत्र झाला. मोदी प्रामाणिक आहेत. भारताला चालवण्यासाठी कोणत्याही महासत्तेची आवश्यकता नाही. त्याला कुणीही घाबरवू शकत नाही. बंदी असतांना ते रशियाकडून तेल खरेदी करत आहेत, यातच सर्वकाही आले.

संपादकीय भूमिका

इम्रान खान यांच्या या वक्तव्यावर भारतातील उपटसुंभ टोळीने त्यांना ‘भाजपचे एजंट’ असल्याचे म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !