तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी आखण्यात आला होता कट !  

  • वर्ष २००२च्या गुजरात दंगलीचे प्रकरण

  • तिस्ता सेटलवाड आणि अन्य दोघांवरील आरोपपत्रात दावा !

नरेंद्र मोदी व तिस्ता सेटलवाड

कर्णावती (गुजरात) – गुजरातचे निवृत्त पोलीस महासंचालक आर्.बी. श्रीकुमार, माजी आय.पी.एस्. अधिकारी संजीव भट्ट आणि सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्यावर गुजरातमधील २००२ च्या दंगलीच्या प्रकरणी गुजरात पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाने १०० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. यात या तिघांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी कट आखला होता. सरकारचा भाग असतांनाही आर्.बी. श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांनी तिस्ता सेटलवाड यांच्यासाठी खोटी कागदपत्रे बनवली आणि नंतर त्यांचा अधिकृत कागदपत्रांमध्ये समावेश केला, असे म्हटले आहे.

आरोपपत्रातील दाव्यानुसार आरोपींना नरेंद्र मोदी यांची राजकीय कारकीर्द संपवायची होती आणि त्यांच्या प्रतिमेला धक्का पोचवायचा होता. खोटी कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्र सिद्ध करण्यासाठी अधिवक्त्यांनी एक फौजच त्यांनी सिद्ध केली होती. दंगलीतील पीडितांची फसवणूक करत बलपूर्वक खोट्या कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आल्या. कागदपत्रे इंग्रजीत असल्याने पीडितांना ‘ते कोणत्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करत आहेत’, याची कल्पना नव्हती. तिस्ता सेटलवाड यांनी पीडितांना ‘साहाय्य न केल्यास परिमाण भोगावे लागतील’, अशी धमकीही दिली होती, असे यात म्हटले आहे.