पंतप्रधान मोदी यांनी ‘ही युद्धाची वेळ नाही’, असे सांगणे अत्यंत योग्य !

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष  इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे संयुक्त राष्ट्र महासभेत प्रतिपादन !

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (डावीकडे ) पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन चर्चा करताना (उजवीकडे)

पॅरिस (फ्रान्स) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ही युद्धाची वेळ नाही’, असे सांगणे अत्यंत योग्य आहे. ही सूड घेण्याची किंवा ‘पाश्‍चिमात्य विरुद्ध आशियाई देश’ असा विरोध करण्याची वेळ नाही. आपल्यासमोर असलेल्या आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याची हीच वेळ आहे, असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७७ व्या अधिवेशनात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या २२ व्या वार्षिक परिषदेच्या निमित्ताने झालेल्या द्विपक्षीय चर्चेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ असा सल्ला दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर मॅक्रॉन यांनी हे विधान केले. मोदी यांच्या विधानावर पुतिन म्हणाले होते, ‘युद्धाविषयीची तुमची चिंता मी समजू शकतो. युद्ध लवकरात लवकर संपवण्याची आमचीही इच्छा आहे; मात्र युक्रेनने चर्चेत रस दाखवलेला नाही.’

युक्रेनमधील संघर्षाविषयी मॅक्रॉन म्हणाले की, रशिया आज दुटप्पी भूमिका घेत आहे; पण युक्रेनमधील युद्ध हा असा संघर्ष नसावा, ज्यामध्ये एखाद्याला उदासीन रहावे लागेल.