जालंधरच्या ‘लव्हली प्रोफेशनल विद्यापिठा’त विद्यार्थ्याची आत्महत्या

आत्महत्येवरून आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार !

जालंधर (पंजाब) – जालंधर येथील ‘लव्हली प्रोफेशनल विद्यापिठाच्या वसतीगृहात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. केरळमधील एजिन एस् दिलीप कुमार असे त्याचे नाव आहे. त्याच्याजवळ आत्महत्येपूर्वीची एक पत्रही सापडले आहे. ही घटना २० सप्टेंबरच्या रात्री घडली. यानंतर विद्यापिठातील विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला. यात काही विद्यार्थी घायाळही झाले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘मृत्यू झालेला विद्यार्थी वाचू शकला असता; मात्र रुग्णवाहिका विद्यापिठात उशिरा पोचली’, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यासोबतच ‘मृताच्या खोलीतून सापडलेले पत्र सार्वजनिक करण्यात यावे’, अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती.

१. पोलिसांना विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात न्यायचा होता; मात्र विद्यार्थ्यांनी रुग्णवाहिकेचा मार्ग अडवला. बर्‍याच प्रयत्नानंतर रुग्णवाहिका दुसर्‍या मार्गाने बाहेर काढण्यात आली.

२. पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांना त्यांचे जबाब नोंदवण्यास सांगत होते. ‘जो कुणी दोषी असेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू’, असे पोलिसांनी सांगितले; पण विद्यार्थी सहमत नव्हते. ‘पत्रामध्ये ज्यांची नावे लिहिली आहेत, ज्यांना आत्महत्येसाठी दोषी ठरवले आहे, त्यांना अटक करावी’, असे विद्यार्थी सांगत होते.

३. या घटनेविषयी विद्यापिठाच्या व्यवस्थापनाने सांगितले की, वसतीगृहाच्या खोलीतून विद्यार्थ्याचे पत्र सापडले आहे. ज्यात त्याने ‘वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली’, असे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या अन्वेषणात पोलीस आणि प्रशासन यांना पूर्ण सहकार्य करत आहेत.