कामचुकार कर्मचार्‍यांना सक्तीची निवृत्ती देणार ! – गोव्यात सर्वसाधारण प्रशासन खात्याचा आदेश

कामात निष्काळजीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांना सक्तीने सेवेतून निवृत्त केले जाणार !
(प्रतिकात्मक चित्र)

पणजी, २० सप्टेंबर (वार्ता.) – सरकारी सेवेत चांगली कामगिरी नसलेल्या, तसेच कामात निष्काळजीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांना सक्तीने सेवेतून निवृत्त केले जाणार आहे. सचिवालयातील खातेप्रमुखांना ‘फंडामेंटल रूल ५६ (जे)’ कायद्याच्या अंतर्गत अशा स्वरूपाचा अधिकार देण्यात आला आहे. ‘सर्वसाधारण प्रशासन विभाग-१’च्या अवर सचिव शैला भोसले यांनी हा आदेश काढला आहे.

 (सौजन्य : Prudent Media Goa) 

सचिवालयातील विविध खात्यांतील कर्मचारी वेळेवर कामावर येत नाहीत, शिस्त पाळत नाहीत आणि वरिष्ठांचे ऐकत नाहीत. हे कर्मचारी कामचुकारपणा करतात आणि नेहमी कर्तव्य बजावण्यास टाळाटाळ करतात. अशा स्वरूपाच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा आदेश काढला आहे. काही कर्मचार्‍यांची कामगिरी चांगली नसल्यास त्यांचे इतरत्र स्थानांतर करण्यात येते; मात्र आता यापुढे कामगिरी चांगली नसलेल्या कामचुकारांच्या विरोधात उपरोल्लेखित आदेशान्वये कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेशात म्हटले आहे. (ही परिस्थिती कशामुळे उद्भवली तेही पहावे लागेल. यांपैकी काही जण मंत्र्यांच्या वशिल्याने, काही जण लाच देऊन आले असतील, तर ते असेच वागणार. त्यामुळे अशा प्रकारे होणारी नोकरभरती आधी बंद करायला हवी ! – संपादक)