वेदांत फॉक्सकॉन प्रकरणाच्या चौकशीची मागणी !
नागपूर – ‘वेदांत फॉक्सकॉन’ प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. राज्यात आलेला उद्योग गुजरात राज्यात जातोच कसा ? नेमके कुठे फिस्कटले ? या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का ? याचीही चौकशी व्हावी. सत्य लोकांसमोर यायला हवे. राजकारण वैयक्तिक नसते. वैचारिक धोरणांवर मी टीका करतो. माझा काही धोरणांना विरोध होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही वैयक्तिक टीका न करता त्यांच्या धोरणांवर टीका केली, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी १९ सप्टेंबर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ‘मनसेने महाविकास आघाडी सरकारचे कधीच कौतुक केले नाही. सत्ताधार्यांच्या विरोधात लढूनच पक्ष मोठा होत असतो’, असेही त्यांनी सांगितले.
‘अधिक आमदारसंख्या असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री’, असे शिवसेना-भाजप युतीच्या काळात ठरले होते !
ते पुढे म्हणाले की, भाजप-शिवसेनेच्या युतीच्या काळात भाजपने कधीच मुख्यमंत्रीपदाची मागणी केली नाही. वर्ष १९८९ मध्ये ज्यांचे अधिक आमदार, त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे ठरले होते, मग शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. आता मात्र मतदान होते, निकाल लागतो आणि नंतर वाटेल त्या प्रकारे निर्णय घेतले जातात. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे प्रचाराच्या वेळी ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार’, असे सांगत होते’, त्या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्षेप का घेतला नाही ? हा मतदारांचा अवमान आहे. या सर्व गोष्टी मतदारांसमोर येणे आवश्यक आहे.
नागपूर येथील मनसेची सर्व पदे विसर्जित करण्यात आल्याची घोषणा !
राज ठाकरे यांनी सांगितले, ‘‘नागपूर येथील मनसेची सर्व पदे विसर्जित करण्यात आली आहेत. घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी घोषित करण्यात येईल. राज्यात मनसेच्या स्थापनेला १६ वर्षे झाली, तरी विदर्भात पक्षाचे अस्तित्व नाही. ज्या गतीने पक्ष विस्तार व्हायला हवा होता, तसा झाला नाही. विदर्भात अनेक तरुण-तरुणी मनसेत काम करण्यास इच्छुक आहेत. त्यांना संधी देण्यात येईल. नागपूर महानगरपालिकेत अनेक दशकांपासून भाजपची सत्ता आहे. प्रस्थापित सत्तेला आव्हान दिल्याविना मोठे होता येत नाही. त्यामुळे आम्ही नागपूर येथे भाजपच्या विरोधात लढू आणि पक्षाला नक्कीच नागपूरकर साथ देतील.’’