चंडीगड विद्यापिठातील ६० विद्यार्थिनींचे आंघोळ करतांनाचे व्हिडिओज सामाजिक माध्यमांतून प्रसारित

  • ८ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न : एकीची प्रकृती चिंताजनक

  • विद्यापिठातील एका तरुणीने व्हिडिओज बनवून मित्राला पाठवल्यावर त्याने केले प्रसारित !

चंडीगड – पंजाबच्या मोहाली शहरातील चंडीगड विद्यापिठात शिकणार्‍या ६० विद्यार्थिनींचे आंघोळ करतांनाचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्याने यांतील ८ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यांतील एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे. हे व्हिडिओ याच विद्यापिठातील एका विद्यार्थिनीने बनवले आणि तिने ते शिमला येथील तिच्या मित्राला पाठवले होते. त्याने ते व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित केले. यानंतर या विद्यापिठात मोठा गोंधळ माजला. विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय या प्रकरणी आंदोलन करत आहेत. व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्‍याचा पोलीस शोध घेत आहेत. व्हिडिओज पाठवणार्‍या विद्यार्थिनीला कह्यात घेण्यात आले आहे. दुसरीकडे विद्यापिठाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी म्हणाल्या की, ‘मी स्वतः जाऊन संपूर्ण प्रकरण काय आहे ?’, ते पाहीन. ‘याप्रकरणी आम्ही कठोर कारवाई करू’, असे शिक्षणमंत्री हरजोत बैंस यांनी सांगितले.

१. ज्या विद्यार्थिनींचे व्हिडिओ प्रसारित झाले आहेत त्या सर्व एम्बीएच्या विद्यार्थिनी आहेत. आरोपी विद्यार्थिनी बर्‍याच दिवसांपासून व्हिडिओ बनवून तिच्या मित्राला पाठवत होती. हे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर पोस्ट केल्यानंतर या विद्यार्थिनींपैकी एकीने ते पाहिल्यावर गोंधळ चालू झाला.

२. विद्यापिठाच्या वसतीगृहाच्या महिला वॉर्डनने (प्रमुखाने) आरोपी विद्यार्थिनीकडे विचारणा केली असता ती म्हणाली, ‘मी हे व्हिडिओ एका मुलाला पाठवले आहेत. मी त्या मुलाला ओळखत नाही.’ वॉर्डनने अनेकदा विचारणा करूनही या विद्यार्थिनीने त्या मुलाचे नाव आणि त्याच्याशी तिचे नाते काय आहे, ते सांगितले नाही. तिला विचारण्यात आले की, ती कधीपासून हे व्हिडिओ बनवत आहे ?, यावरही तिने उत्तर दिले नाही. ती ‘पुन्हा पुन्हा चूक झाली, आता यापुढे करणार नाही’ असे सांगत राहिली.

३. आंघोळीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्व विद्यार्थिनी वसतीगृह रिकामी करून बाहेर आल्या. त्यांनी ‘आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणा देण्यास चालू केले. विद्यार्थिनींनी संपूर्ण विद्यापिठाला वेढा घातला. हे पाहून सुरक्षा कर्मचार्‍यांनी विद्यापिठाचे दरवाजे बंद केले. तत्काळ पोलीस दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी विद्यार्थिनींना शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांच्या पथकांची वाहने उलटवली. त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

  • समाजातील नैतिकतेचा दिवसेंदिवस र्‍हास होत चालल्याचेच हे दर्शक आहे !
  • विद्यापिठांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ शिक्षित केले जाते; मात्र त्यांच्यावर संस्कार करण्यात येत नसल्याने अशा प्रकारच्या ओधगतीकडे ते चालले आहेत ! ही स्थिती पालटण्यासाठी विद्यार्थ्यांना लहानपणापासून साधना शिकवून धर्माचरण करून घेणे महत्त्वाचे !