हिजाब अनिवार्य असल्याच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी !
तेहरान (इराण) – इराणमध्ये महिलांनी हिजाब घालणे अनिवार्य असल्याने तो न घालणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. हिजाब न घातल्याने पोलिसांनी महसा अमिनी नावाच्या २२ वर्षीय तरुणीला १३ सप्टेंबर या दिवशी अटक केली होती; परंतु ३ दिवसांनी कारागृहात बेशुद्ध पडल्याने रुग्णालयात नेत असतांना तिचा मृत्यू झाला. यावरून इराण सरकार आणि पोलीस यांचा विरोध केला जात आहे.
१. इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार महसा तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी तेहरानला आली होती. तिने हिजाब घातला नसल्याने पोलिसांनी तिला तात्काळ अटक केली.
२. अटक झाल्यानंतर काही घंट्यांतच अमिनी कोमात गेली. तिला रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
३. तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, महसाला कोणताही आजार नव्हता. तिचा मृत्यू संशयास्पद आहे.
४. इराणमध्ये वर्ष १९७९ पासून हिजाब अनिवार्य असला, तरी १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी एका आदेशावर स्वाक्षरी केली आणि ‘ड्रेस कोड’ म्हणून त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले.
मृत्यूला होत आहे विरोध !
इराणमधील अमेरिकेचे राजदूत रॉबर्ट मॅल्ले म्हणाले की, महसा कोठडीत जखमी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकार्यांना शिक्षा झाली पाहिजे. इराणने महिलांवरील अत्याचार थांबवले पाहिजेत.
इराणचे अधिवक्ता सईद देहगन यांनी महसाच्या मृत्यूला हत्या म्हटले आहे. ते म्हणाले, तिच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे तिथे अस्थिभंग झाला आणि ती कोमात गेली.
पोलिसांनी आरोप फेटाळले !
महसाच्या मृत्यूनंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये पोलिसांविरोधात निदर्शने होत आहेत. महसाला मारहाण केली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘तिला पोलीस ठाण्यात नेले असता ती बेशुद्ध पडली’, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचवेळी राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांनी गृहमंत्र्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
संपादकीय भूमिका‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ आणि ‘स्त्रीमुक्ती’ यांचा उदोउदो करणारी उपटसुंभ टोळी हिंदूंच्या मंदिरांत वेशभूषा अनिवार्य केल्यावर आकांडतांडव करते; परंतु हिजाब परिधान न करणार्या महिलांवर कारवाई करणारा इस्लामी देश इराणच्या विरोधात चकार शब्दही काढत नाही, हे जाणा ! |