माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि पितृऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. माता-पित्यांचा मृत्यूत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. कालच्या अंकात ‘पिंडाला कावळा शिवणे यामागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन आणि कावळा न शिवल्यास काय करावे’, याविषयी पाहिले. आज ‘श्राद्ध कुणी करावे ?’ हे जाणून घेऊया.
१. स्वतः करणे महत्त्वाचे
‘श्राद्धविधी स्वतः करायचा असतो. तो स्वतःला करता येत नाही; म्हणून आपण ब्राह्मणाकडून करवितो. आता श्राद्ध करणारे ब्राह्मणही मिळेनासे झाले आहेत. यावर उपाय म्हणून श्राद्ध-संकल्पविधीच्या पोथ्या मिळतात. त्या आणून प्रत्येकाने श्राद्ध-संकल्पविधी पाठ करावा. हा पाठ संस्कृत भाषेत असतो. आपण अन्य भाषा शिकतो, मग संस्कृत तर देवभाषा आहे. तसेच ती आपल्याला सहज येण्यासारखीही आहे.
(वरील सूत्र तत्त्वतः योग्य असले, तरी संस्कृत भाषेतील उच्चारांतील काठिण्य, शास्त्रात सांगितलेला विधी नीट आकलन होण्याची मर्यादा आदी पहाता स्वतः श्राद्धविधी यथासांग पार पाडणे, हे सर्वांच्याच संदर्भात शक्य होईल असे नाही. अशांनी ब्राह्मणाकरवी आणि ब्राह्मण न मिळाल्यास एखाद्या जाणकाराकरवी श्राद्धविधी करण्यास हरकत नाही. श्राद्धविधी होणे, हे जास्त आवश्यक आहे, हे येथे लक्षात घ्यावे. – संकलक)
२. श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करणे आवश्यक असणे
पूर्वजांची स्पंदने आणि त्यांच्या सर्र्वांत जवळच्या वारसदारांची स्पंदने, यांमध्ये पुष्कळ साधर्म्य असते. एखादा सूक्ष्म-देह वेदना अनुभवत असतो, तेव्हा त्या त्रासाची स्पंदने त्याचा सर्वांत जवळचा वारसदारही अनुभवत असतो. याच कारणास्तव श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करायचे असतात. मुलाची स्पंदने आणि पितरांची स्पंदने एकसारखीच असल्यामुळे श्राद्धतर्पणाच्या वेळी मुलाने दिलेले तर्पण पितरांना ग्रहण करणे सुलभ होते.’
२ अ. पहिल्या आणि शेवटच्या मुलाला श्राद्ध करण्याचा अधिकार असण्याचे अन् मधल्याला नसण्याचे कारण काय ? : ‘ज्या वेळी प्रथम मुलाच्या संदर्भात गर्भधारणा होते, त्या वेळी त्या जिवाची तीव्र इच्छाशक्ती कार्य करते. यामुळे त्याच्या माध्यमातून केलेले विधी तीव्र इच्छाबीजातील शक्तीच्या बळावर पूर्वजांच्या वासना तृप्त करून त्यांना संतुष्ट करतात. शेवटचा मुलगा हा वंश संपुष्टात येण्याचे प्रतीक असल्याने याच्याकडूनही पूर्वजांच्या अपेक्षा तीव्र स्वरूपात असल्याने त्याने केलेले कर्मही तीव्र इच्छेच्या प्रमाणात कार्य करते. मधल्या मुलाला तुलनेत गौण स्थान असल्याने, म्हणजेच या मुलाकडून पूर्वजांच्या अपेक्षा अल्प प्रमाणात असल्याने त्याच्याकडून विधी करवून घेण्यात फलप्राप्ती अल्प असते; म्हणून केवळ पहिल्या आणि शेवटच्या मुलाला हिंदु धर्माने श्राद्धविधी करण्याचा अधिकार दिला आहे.
२ आ. सासरा आणि पती जिवंत असतांना स्त्रीचा मृत्यू झाल्यास तिचा अंत्यसंस्कार अन् श्राद्ध पतीने का करावे ? : विवाहितेचा मृत्यू झाल्यास तिच्या पतीलाच अंत्यसंस्कार आणि श्राद्ध करण्याचा प्रथम अधिकार आहे; कारण पत्नीचा पतीशी देवाणघेवाण संबंध सर्वांत अधिक असल्याने पतीकडून तिच्या अपेक्षाही अधिक असतात. त्यामुळे इतरांपेक्षा पतीने केलेल्या विधीमुळे पत्नीच्या लिंगदेहाला गती मिळण्याची शक्यता जास्त असते.
२ इ. विधवा स्त्रीच्या मृत्यूनंतर तिचे श्राद्ध मुलाने का करावे ? : विधवा स्त्रीच्या मृत्यूनंतर तिचा अंत्यसंस्कार आणि श्राद्ध करण्याचा अधिकार तिच्या मुलाला आहे; कारण स्त्रीचा इतरांपेक्षा प्रथम पतीशी आणि त्यानंतर स्वतःच्या मुलाशी देवाणघेवाण संबंध जास्त असल्याने योग्य घटकांच्या माध्यमातून केल्या जाणार्या श्राद्धविधीतील फलप्राप्तीही जास्त असते.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या ‘एक विद्वान’ नावानेही लिहितात.)
३. श्राद्धविधी अमुक एक व्यक्ती करू शकत नाही; म्हणून केला नाही, असे कुणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदु धर्म !
‘मुलगा (उपनयन न झालेलाही), मुलगी, नातू, पणतू, पत्नी, संपत्तीत वाटेकरी असणार्या मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या आणि धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड (सात पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही), समानोदक (सात पिढ्यांनंतरचे गोत्रातील कोणीही), शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्याने श्राद्ध करावे.
एकत्र कुटुंबात कर्त्या वडीलपुरुषाने (कुटुंबात वयाने मोठ्या किंवा सर्वांच्या पालनपोषणाचे दायित्व असलेल्या व्यक्तीने) श्राद्धे करावीत. विभक्त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धे करावीत.’
प्रत्येक मृत व्यक्तीसाठी श्राद्ध केले जाईल आणि त्याला सद्गती मिळेल, अशी पद्धत हिंदु धर्माने तयार केली आहे. ‘एखाद्या मृत व्यक्तीचे कोणीही नसल्यास त्याचे श्राद्ध करण्याचे कर्तव्य राजाचे असते’, असे धर्मसिंधु या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे.
(यावरून हे लक्षात येते की, श्राद्धविधी अमुक एक व्यक्ती करू शकत नाही; म्हणून केला नाही, असे कुणालाही म्हणायची संधी हिंदु धर्म देत नाही ! हिंदु धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, जो प्रत्येक व्यक्तीची तिच्या मृत्यूनंतरही काळजी घेतो. इतके पर्याय असूनही हिंदू श्राद्ध वगैरे करत नाहीत. – संकलक)