गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे सविस्तर अहवाल मागितला ! : सांगली येथे साधूंना झालेल्या मारहाणीचे प्रकरण

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – सांगली येथे साधूंना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे सविस्तर अहवाल मागितला आहे. रशियाच्या दौर्‍यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली.

फडणवीस यांनी दूरभाषवरून पोलीस महासंचालकांकडून हा प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. ‘हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाकडे तुम्ही स्वत: लक्ष द्या. अन्वेषण कसे चालू आहे ? मारहाण करणारे कोण होते ? याविषयीचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर कसा प्रसारित झाला ? याविषयी संपूर्ण माहितीचा अहवाल द्यावा’, अशी सूचना फडणवीस यांनी या वेळी दिली. कर्नाटक येथून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणार्‍या ४ साधूंना जत तालुक्यातील लवंगा परिसरातील ग्रामस्थांनी अमानुष मारहाण केली. मारहाण करणार्‍यांपैकी ७ जणांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे. मारहाण करणार्‍यांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे पुढे आले आहे.