कोल्हापूर – नवरात्रोत्सवाच्या काळात बाहेरील गावासह कोणत्याही स्थानिक भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे जलद दर्शन घेता यावे, यासाठी २०० रुपये देऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन चालू करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री महालक्ष्मी मंदिरात सोडल्या जाणार्या मुख्य दर्शन रांगेजवळून सशुल्क ‘ई-पास’ काढलेल्या भाविकांची रांग मंदिरात सोडून त्यांना श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनास सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. (अशा प्रकारे सशुल्क दर्शनसेवेमुळे भाविकांमध्ये भेदभावाची भावना निर्माण होऊ शकते. दूरवरून येणार्या ज्या भक्ताकडे २०० रुपये नाहीत, त्यांनी काय करायचे ? देवाच्या दृष्टीने गरीब-श्रीमंत असे सर्व समान असल्याने प्रत्येकासाठी दर्शनाची पद्धत सारखीच असणे अपेक्षित आहे ! – संपादक)
या संदर्भात बैठकीत सचिव शिवराज नाईकवाडे म्हणाले, ‘‘तुळजापूर येथे श्री भवानीमातेच्या दर्शनासाठी जशी सशुल्क सेवा आहे, त्याच धर्तीवर श्री महालक्ष्मी मंदिरात ‘ई-पास’ सेवा चालू करण्याचा प्रस्ताव मांडला. नवरात्रोत्सवात शेकडो भाविक श्री महालक्ष्मीदेवीचे थेट दर्शन मिळावे यासाठी सातत्याने देवस्थान समितीकडे संपर्क साधतात. त्यामुळे त्याचा विचार करून सशुल्क दर्शन सेवा करण्याचा विचार चालू आहे. यामुळे देवस्थान समितीच्या उत्पन्नात वाढ होईल.’’ (केवळ उत्पन्न वाढीचा विचार करण्यासाठी मंदिर हे एखादे आस्थापन आहे का ? – संपादक)
संपादकीय भूमिकामंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम ! पैसे देऊन देवतेचे दर्शन चालू करणे हे इतरांवर अन्यायकारक नव्हे का ? ‘देवीला भावभक्तीयुक्त अंत:करणाने दर्शन घेणे आवडेल कि पैसे देऊन दर्शनाला भाविक आलेले आवडेल ?’, याचा देवस्थान समितीने विचार करावा ! |