नागपूर – ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’चे (सी.एन्.आय.) मॉडरेटर आणि ख्रिस्ती पाद्री पी.सी. सिंग यांनी तब्बल १ सहस्र कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आणि आतंकवादी दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे. छत्तीसगडमधील नीलेश लॉरेन्स यांनी याविषयी तक्रार केली होती.
सिंग हे जर्मनीहून परत येत असतांना ‘ईओडब्ल्यू’च्या पथकाने त्यांना नागपूर विमानतळावरून कह्यात घेतले. त्यांचे आतंकवाद्यांशी संबंध असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चर्चचे सध्याचे मॉडरेटर डी.जी. भांबल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सिंग यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) किंवा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या अन्वेषण यंत्रणेच्या साहाय्याने चौकशीची मागणी केली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. सिंग यांचे घर आणि कार्यालय यांवर आर्थिक गुन्हे शाखेने धाडी टाकल्या. यामध्ये परकीय चलनासह अनुमाने २ कोटी रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.
पाद्री सिंग आणि दाऊद यांचा हस्तक रियाझ भाटी यांच्यात काही व्यवहारांची चर्चा झाल्याची माहिती आहे. शाळांकडून शुल्क म्हणून वसूल केलेल्या २.७ कोटी रुपयांचा अपव्यवहार केल्याप्रकरणी बिशप सिंग यांच्यावर ‘ईओडब्ल्यू’ने कारवाई केली आहे. डायोसेसन शिक्षण मंडळाचे नेतृत्व पालटण्यासाठी ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. तसेच ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’चा ब्रिटीशकालीन जिमखाना वर्ष २०१६ मध्ये भाटी याला ३ कोटी रुपयांना भाडेतत्त्वावर दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.