अमरावती येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील तरुणी सातारा येथे सापडली !

अमरावती – येथील ‘लव्ह जिहाद’प्रकरणी बेपत्ता झालेली तरुणी सातारा येथे सापडली आहे. येथील कांदे बटाटे विकणार्‍या मुसलमान तरुणाने एका हिंदु तरुणीशी बळजोरीने निकाह करून तिला घरी डांबून ठेवल्याचा आरोप नवनीत राणा आणि तरुणीच्या कुटुंबीय यांनी केला होता. त्यानंतर राणा यांनी पोलिसांना समयमर्यादा देऊन तरुणीचा शोध घेण्यास सांगितले होते. या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्या होत्या. तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर पोलिसांनी अन्वेषणाची गती वाढवली.

येथील पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह म्हणाल्या की, ही तरुणी गोवा एक्सप्रेस रेल्वेतून एकटी प्रवास करत होती. आम्ही पुणे रेल्वे पोलीस आणि सातारा पोलीस यांच्याशी संपर्क साधून मुलीचे ठिकाण पाठवून दिले होते. त्यानंतर सातारा पोलिसांनी गोवा एक्सप्रेस ५ मिनिटे थांबवली आणि तरुणीचा शोध घेऊन तिला कह्यात घेतले.

भाजप, बजरंग दल, विहिंपचे कार्यकर्ते जागृत असल्यामुळे तरुणी सापडली ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार

भाजप, बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद संघटनांचे कार्यकर्ते जागृत असल्यामुळे हिंदु तरुणी सातारा येथे सापडली आहे, असा दावा भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.

बोंडे पुढे म्हणाले की, धारणी अकोटमधून २ मासांपूर्वी पळवून नेलेल्या तरुणीचा दूरभाष आला. तिला मारहाण होत होती. ती मुलगी धारणीत येत आहे.  आता पोलिसांनी गुन्हे नोंद करावेत, त्या मुसलमान मुलांना अटक करावी, त्यांना साहाय्य करणार्‍यांवर गुन्हे नोंद करावेत.’’