आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची गोलपारा येथील मदरसा स्थानिकांनी पाडल्यावर स्पष्टोक्ती !
गोहत्ती (आसाम) – आसामच्या गोलपारा येथे स्थानिक लोकांनी संघटित होऊन एक मदरसा पाडला. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले की, जे मदरसे आतापर्यंत पाडण्यात आले आहेत, ते मदरसे नव्हते, तर अल्-कायदाचे अड्डे होते. आम्ही २-३ मदरसे पाडले, तर आता जनता स्वतःच त्यांना पाडत आहे. स्थानिक मुसलमानच पुढे येऊन ते पाडत आहेत आणि म्हणत आहेत, ‘जेथे अल्-कायदाच्या कारवाया चालतात, असे मदरसे आम्हाला नकोत.’
गोलपाराच्या मदरशाचा संचालक जलालुद्दीन शेख याला आतंकवादी कारवायात सहभागी असल्यावरून अटक करण्यात आली. अनिमुल इस्लाम, उस्मान, मेहदी हसन आणि जहाँगीर आलोम यांपैकी दोघे अल्-कायदा आणि अंसारुल्लाह बांग्ला टीम या आतंकवादी संघटनेशी संबंधित असून ते पसार आहेत.