अग्नि गणपति

गणेशोत्सव २०२२

‘गणपति हे एका देवतेचे विशेषण म्हणून ऋग्वेदात आलेले आढळते. ‘ज्याच्या अंतःस्थ तेजाने अग्नि प्रज्वलित होतो, सूर्य प्रकाशतो आणि हे विराट विश्व उजळून निघते, त्या गणेशाने आमचे जीवनही प्रसन्न अन् प्रकाशमय करावे’, अशी भारद्वाज ऋषींची प्रार्थना आहे. ऋग्वेदामध्ये अग्नि आणि गणपति यांच्यामध्ये अतिशय साम्य दाखवले आहे. तोच हा अग्नि गणपति ! त्यामुळे अग्नि हासुद्धा गणपति कसा ? किंवा गणपति हेही अग्नीचे किंवा यज्ञाचे प्रतीक कसे ? तर…

१. गणपतीला ‘लंबोदर’ म्हटले जाते. अग्नीही ‘लंबोदर’, म्हणजे पुष्कळ भक्षण करणारा आहे. त्यात कितीही आहुती दिल्या, तरी अग्नी शांत होत नाही.

२. गणपतीला मूषकध्वज किंवा धूम्रध्वज म्हणतात. ऋग्वेदात अग्नीलाही धूम्रध्वज आणि धूम्रकेतू म्हटले आहे. गणपतीचे वाहन उंदीर आहे. ‘तैतरीय संहिते’त असे वर्णन आहे की, पृथ्वी सूर्यापासून वेगळी झाली आणि अग्नि उंदराप्रमाणे पृथ्वीच्या पोटात गेला.

३. गणपतीला विनायक, म्हणजेच विशेष प्रकारचा नायक (सेनापती) म्हटले जाते. ‘काठकसंहिते’त अग्नि हा देवांचा सेनापती समजला जातो.

४. गणपति हे यज्ञाचे प्रतीक असल्याने त्याचे विसर्जन जलाशयात करतात. अग्नीचे घर पाणी किंवा समुद्र आहे. त्यामुळे यज्ञातील पवित्र अग्नी पाण्यात विसर्जित करावा, असे शास्त्र आहे.

५. योगशास्त्राप्रमाणे आपल्या शरिरातील अंतर्भागात मूलाधारचक्रात जी कुंडलिनी शक्ती आहे, ती अग्नीचेच रूप आहे. गणपतीलाही अथर्वशीर्षात मूलाधारचक्रात नित्य रहाणारा असे म्हटले आहे.’

(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’)