धार्मिक उत्सवांमधील चुका टाळा !

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळीतील वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये लावणी, कव्वाली, हास्य-विनोद या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे आयोजन धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या ‘नाथ प्रतिष्ठान संस्थे’ने केले होते. गणेशोत्सवासारख्या धार्मिक कार्यक्रमात अशा प्रकारे मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या आयोजनावरून समाजातून मुंडे यांच्यावर पुष्कळ टीका झाली.

टीका होत असतांना मुंडे म्हणाले, ‘‘सांस्कृतिक कार्यक्रमांवरून विविध सामाजिक कार्यात आणि संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांच्या साहाय्याला धावून जाणार्‍या ‘नाथ प्रतिष्ठान संस्थे’ला अपकीर्त करू नका. तुमचा राग माझ्यावर असेल, तर व्यक्तीगत माझ्यावर टीका करा.’’ यामध्ये टीका करणार्‍यांचा उद्देश हा ‘नाथ प्रतिष्ठान संस्थे’ला अपकीर्त करणे, असा नसून धार्मिक उत्सवांमध्ये योग्य कार्यक्रमांचे आयोजन होणे अपेक्षित आहे. अशा प्रकारच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍यांवर टीका होते, याचाच अर्थ आयोजकांनी आपल्याकडून नेमके काय चुकलेले आहे ? याकडे पहाणे आवश्यक आहे. ही टीका होत असतांना मुंडे यांच्या उत्तरातून ‘लोक आपल्यावर टीका का करत आहेत ?’, असा त्यांचा अंतर्मुख होऊन विचार झाला नाही, तसेच ‘धार्मिक उत्सवांमध्ये चुकीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत’, याकडेही त्यांचे लक्ष नाही, असे विचार जनतेच्या मनात आले.

‘एखादी संस्था नेहमी सामाजिक कार्य चांगले करते’, याचा अर्थ त्या संस्थेने अन्य वेळी चूक केल्यास त्याविषयी कुणी बोलू नये, असा होत नाही. सामाजिक कार्य करणार्‍या संस्था असोत किंवा लोकप्रतिनिधी असोत, प्रत्येकाने हिंदु धर्मातील धार्मिक उत्सवांचा योग्य आदर राखणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे योग्य आदर्श न राखणार्‍यांवर जनेततून टीका होत आहे, हे हिंदू जागृत होत असल्याचे द्योतक आहे. हिंदूंनी धार्मिक उत्सवांतील गैरप्रकार होऊ न देण्यासाठी जागृत होऊन वैध मार्गाने विरोध करून असे गैरप्रकार थांबवणे अपेक्षित आहे. संघटितपणे प्रयत्न करून धार्मिक उत्सवांमधील गैरप्रकार थांबवणे, हेच समष्टी धर्माचरण आहे. हे लक्षात घेऊन हिंदूंनी कार्यक्रम होण्यापूर्वीच त्याला विरोध कसा करता येईल ? असे पहायला हवे. जेणेकरून अयोग्य कार्यक्रमच होणार नाहीत आणि कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍यांकडून झालेली चूकही टळेल. ही श्री गणेशाची समष्टी उपासना ठरेल. यातून हिंदूंवर त्याची अधिक कृपादृष्टी होईल !

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर