भाजपचे नेते श्री. माधव भांडारी यांचे नुकतेच ‘डाव्यांचा खरा चेहरा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. २३६ पानांच्या या पुस्तकात १३ प्रकरणे आहेत. गेल्या १०० वर्षांत डाव्या किंवा साम्यवादी विचारसरणीच्या लोकांचा प्रत्यक्षात असणारा भयावह चेहरा बिनतोड पुराव्यांसह यात उघड करण्यात आला आहे. हिंदुत्वनिष्ठांना सातत्याने हिणवणार्या डाव्यांना प्रतिप्रश्न करण्यासाठी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाच्या संग्रही असावे, असे हे पुस्तक…! या पुस्तकाची आमच्या वाचकांना ओळख व्हावी, यासाठी अल्पशा शब्दांत त्याचा सारांशरूपी गोषवारा देत आहोत.
हिंदुत्वाच्या विरोधकांचा वैचारिक स्तरावर समाचार घेणारी एक पोकळी भरून काढणारे पुस्तक !
संघ आणि भाजप यांच्या वर्तुळात विचारवंत म्हणून ओळखले जाणारे माधव भांडारी यांचे हे पुस्तक ‘साम्यवादाची पोलखोल करण्या’च्या महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडणारे तर आहेच; पण महाराष्ट्रापुरते पहायचे म्हटले, तर हिंदुत्वाच्या विरोधकांचा वैचारिक स्तरावर समाचार घेणारी एक पोकळी राहिली होती, ती या पुस्तकाच्या निमित्ताने भरून निघाली आहे !
डाव्यांना कोंडीत पकडून त्यांची बोलती बंद करणारे प्रश्न विचारण्याची सोय या पुस्तकामुळे होईल !
एरवी स्थिती अशी असते की हिंदु धर्म, हिंदु परंपरा, हिंदुत्व, हिंदु नेते यांना साम्यवाद्यांनी नावे ठेवायची, आरोप करायचे, त्यांच्यावर उपहासात्मक टीका करायची, त्यांचा अवमान करायचा आणि साम्यवाद्यांच्या या आरोपांची प्रत्युत्तरे किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे किंवा स्पष्टीकरणे हिंदुत्वनिष्ठांनी द्यायची असाच खेळ चालू असतो ! हे कधीतरी पालटण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी डाव्यांनाही प्रश्न विचारले जाणे आवश्यक आहे ! नेमकेपणाने ते कोणते प्रश्न विचारावेत ? याची भरपूर सोय या पुस्तकातून झाली आहे, असे आनंदाने म्हणावेसे वाटते !
डाव्यांचा हिंसाचार आणि भ्रष्टाचार यांची उदाहरणांसहित ‘पोलखोल’ !
‘डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकातून उदाहरणासहित उघड होतो. डाव्यांनी नक्षलवाद्यांना सोयिस्कररित्या कसे वेगळे दाखवले आहे, ते लक्षात येते. एरवी ‘समाजाच्या भल्या’साठी म्हणणार्यांच्या दाव्यांमागील सत्य जेव्हा बाहेर येते, तेव्हा कशी स्थिती होते ? ते यातून लक्षात येते. साम्यवाद्यांची सत्ता असलेल्या ठिकाणचा विकास कसा खुंटतो ? हिंसाचार कसा वाढतो ? आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचार कसा वाढतो ? याची भरपूर उदाहरणे यात आहेत.
हिंदुत्वनिष्ठांनी या पुस्तकाचा उपयोग प्रचार-प्रसारासाठी केला, तर त्याला न्याय मिळेल !
हे पुस्तक वाचून ठेवावेसे वाटणार नाही, असे तर आहेच; पण वाचून केवळ खाली ठेवूही नये. या पुस्तकाचा वापर हिंदुत्वनिष्ठांनी त्यांच्या प्रचार-प्रसारात केला पाहिजे ! त्यामुळेच कदाचित् हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा श्री. भांडारी यांना ज्यातून झाली असेल, त्या मनोभूमिकेला न्याय मिळाला असे होईल, असे वाटते.
साम्यवाद्यांच्या खुनशी विकृती आणि खोटारडेपणा यांचे पुरावे देणारे पुस्तक !
बंगालमध्ये ‘ज्यांना मारायचे आहे, त्यांना भूमीत खोलवर जिवंत पुरायचे आणि वरून मिठाचा थर द्यायचा, म्हणजे काहीच उरत नाही’, असे प्रयोग कशा पद्धतीने करण्यात आले ? याची उदाहरणे यात आहेत. रशिया किंवा चीन पुरस्कृत साम्यवादी देशात कुठल्या थराला जात असतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही, याची उदाहरणे याच्यात आहेत ! साम्यवाद्यांच्या खोटारडेपणाची, त्यांच्या बिलंदरपणाची, तसेच वैचारिक आतंकवादाची अशी अनेक उदाहरणे या पुस्तकात अभ्यासपूर्ण मांडलेली आहेत.
पाकची निर्मिती होण्यासाठी मुस्लिम लीगला पाठिंबा देणे, वर्ष १९६२ च्या युद्धात चीनच्या बाजूने उभे रहाणे आणि रशियाने भारताला साहाय्यासाठी प्रयत्न करू नये, यासाठी कारस्थाने रचणे, वर्ष १९७५ मध्ये आणीबाणीचा पुरस्कार करणे, लोकशाहीचे नाव घेऊन लोकशाहीलाच विरोध करणे हे सारे डाव्यांचे कट श्री. भांडारी यांनी यात उघड केले आहेत. केरळ, त्रिपुरा, बंगाल या ठिकाणी भ्रामक प्रचार करून डाव्यांनी सत्ता हस्तगत केली, त्या ठिकाणी त्यांनी खोटा इतिहास मांडून जनतेची फसवणूक केली. भ्रष्टाचार आणि असहिष्णूतेची परिसीमा गाठली. सनातन हिंदु धर्माला विरोध करणे आणि देशाची मूळ संस्कृती नष्ट करणे, याच उद्देशाने डावे अहोरात्र प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी त्यांना विदेशातून आर्थिक साहाय्य मिळते, हे ‘परममित्र प्रकाशन’च्या या पुस्तकात सविस्तरपणे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत देशाच्या एकत्वाविषयी शंका निर्माण करून, सहिष्णु हिंदूंवर अक्षरशः ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असल्याप्रमाणे आरोप करून, तसेच तथाकथित समानता आणि मानवता यांसारख्या थोतांड संकल्पना वापरून सातत्याने साम्यवाद्यांनी हिंदूंचा बुद्धीभेद केला, त्यांचे खच्चीकरण केले अन् त्यांच्यात न्यूनगंड निर्माण केला. हिंदूंमधील क्षात्रवृत्ती मारली. प्रत्यक्षात हे साम्यवादीच क्रूर आणि हिंदुद्वेष्टे असल्याने त्यांनी गेल्या १०० वर्षांत हिंदूंची आणि या राष्ट्राची कधीही भरून न निघणारी अतीव हानी केली. यामागे आंतरराष्ट्रीय हातही आहे; परंतु अनेक हिंदू या सत्याविषयी आजही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे हे कटु सत्य जगासमोर आणण्यास हे पुस्तक एक उत्तम माध्यम होईल; ज्यातून साम्यवाद्यांचा काळा इतिहास पुराव्यासह समोर येईल.
वरील सर्व कारणांमुळे हे पुस्तक केवळ वाचनीयच नव्हे, तर अभ्यासनीय आणि संग्रहणीय आहे !
जगाला हिंसाचाराची भेट देणार्या साम्यवाद्यांचे खरे स्वरूप जगासमोर येऊन साम्यवादाचा अंत होणे आवश्यक ! |