नागपूर – स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’निमित्त देशात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली होती. कोट्यवधी लोकांनी स्वतःच्या घरावर तिरंगा ध्वज लावला होता. अनेकांना ध्वज उपलब्ध झाले नव्हते. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे देशभावना जागृत होईल, असा त्यामागचा उद्देश होता; मात्र अवघ्या काही दिवसांत शहरात ४ सहस्र राष्ट्रध्वज तलावाच्या काठावर टाकून दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही घटना जिल्ह्यातील कोराडी तलावाला लागून असलेल्या नांदा परिसरात उघडकीस आली आहे. ४ पोत्यांमध्ये राष्ट्रध्वज होते. त्यातील एका पोत्यावर ‘मौदा पंचायत समिती’ असे लिहिलेले आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहीम पार पडल्यानंतर कोणीतरी दायित्वशून्यपणाने कर्मचारी किंवा पुरवठादार यांनी अशा पद्धतीने राष्ट्रध्वज तलावाच्या काठावर टाकले आहेत का ?, अशी शंका निर्माण झाली आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. टाकलेल्या राष्ट्रध्वजांची संख्या ३ सहस्र ९६५ एवढी आहे.