श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या नियोजनाचा पुणे महापालिकेचा बोजवारा !
पुणे – नदीत विसर्जन करण्यास घातलेली बंदी, नदीपात्राजवळ उपलब्ध नसलेले हौद यांमुळे गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. भिडे पूल, वृद्धेश्वर, सिद्धेश्वर घाटांवरील कृत्रिम विसर्जन हौदात माती टाकून ते बंद केले आहेत. भिडे पूल येथे नारायण पेठ, सदाशिव पेठ, शनिवार पेठ यांसह इतर भागांतून भाविक मोठ्या प्रमाणात विसर्जनासाठी गेले. त्या वेळी तेथील हौद बंद असल्याचे निदर्शनास आले, तर एकच फिरता हौद उपलब्ध असल्याने आणि त्याची क्षमता संपल्याने भाविकांना ताटकळत उभे रहावे लागले.
भाविकांनी याविषयी प्रशासनाला जाब विचारल्यानंतर फिरते हौद उपलब्ध करून देण्यासाठी अधिकार्यांनी धावपळ चालू केली. अशीच स्थिती इतर घाटांवरही निर्माण झाली होती. महापालिका विसर्जनावर कोट्यवधी रुपये खर्च करत असली, तरी त्याचा नागरिकांना उपयोग होत नसल्याचे समोर आले आहे.
कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर म्हणाले की, हवामान खात्याने मुसळधार पावसाची चेतावणी दिली आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडले, तर महापालिकेने केलेली सर्व उपाययोजना वाया जाईल. त्यामुळे आम्ही हौद चालू केले नाहीत; पण क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३८ ठिकाणी लोखंडी हौद आणि ९ फिरते हौद उपलब्ध करून दिले आहेत.
संपादकीय भूमिका
|