प्राध्यापक : भारतातील भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक !

५ सप्टेंबर या दिवशी (काल) शिक्षकदिन झाला. त्या निमित्ताने…

महाविद्यालयात अध्ययन आणि अध्यापन करत असतांना आलेले अनुभव !

काल शिक्षकदिन झाला. त्या निमित्ताने प्रा. महावीर श्रीश्रीमाळ यांना शिक्षण क्षेत्रात कार्य करतांना आलेले अनुभव येथे देत आहोत. या लेखाच्या पहिल्या दोन भागांमध्ये प्राध्यापकांवरील प्रभावहीन नियंत्रण, प्राध्यापक भरतीमधील अपप्रकार, तसेच वेळापत्रकातील गोंधळ आणि प्राध्यापकांची तासिका टाळण्याची मानसिकता, त्यांची जातीय मानसिकता, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याकडून परीक्षेच्या वेळी होणारे अपप्रकार, ही सूत्रे पाहिली. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/610074.html

६. प्राध्यापकांची एकमेकांविषयी असलेली असूया आणि त्यांचे होत असलेले नैतिक अध:पतन !

६ अ. ३० किलोमीटर अंतरावर रहाणार्‍या एका विद्यार्थिनीने मला देण्यासाठी तिला विषय शिकवणार्‍या प्राध्यापकांसमवेत दोनदा काकवी आणि एकदा काटेरी वांगी आणली होती; परंतु त्या प्राध्यापकांनी माझ्याविषयी टिपणी करत तिच्याकडून सारे स्वत:साठी ठेऊन घेतले. याचे तिला वाईट वाटून ती रडली. तेव्हा ‘दत्तगुरूंनी २४ गुणगुरु करून ते त्यांच्याकडून शिकले, तसे आपणही करायला हवे. तुला स्वत:ला जमेल, तेव्हा भाजी बनवून आण. मी ती खाईन’, असे बोलल्यावर ती शांत झाली.

६ आ. सहकारी प्राध्यापिकेने केशरचना पालटल्याचे पाहून दुसर्‍या प्राध्यापिकेने असूयेपोटी तशी केशरचना केली. त्यामुळे त्या दोघींमध्ये अंतर अजून वाढले.
६ इ. एकदा सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या बाहेरील युवकाने महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या गळ्यात हात घातलेले पाहूनही तेथे असलेल्या प्राध्यापिकेने दुर्लक्ष केले.

६ ई. एका महाविद्यालयातील एक प्राध्यापक आणि प्राध्यापिका हॉटेलमध्ये कॉफी घेतांना अन् एकत्र फिरतांना पाहून विद्यार्थ्याने त्याचे चित्रीकरण केल्याचे एका प्राध्यापिकेने मला सांगितले. मला ‘ती चित्रफीत तुम्हाला दाखवू का ?’, असे विचारले. तेव्हा ‘त्या दोघांनी एकत्र फिरण्याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा त्यांचे जोडीदार काय ते पहातील’, असे बोलून मी तो विषय बंद केला. नंतर ती चित्रफीत केल्याविषयी अफवा असल्याचे समजले.

६ उ. याच प्राध्यापिकेने ‘तुम्ही एका प्राध्यापिकेशी बोलू नका, त्याची वेगळी चर्चा होते’, असे सांगितले. तेव्हा त्यांच्यासमोर मी पत्नीला भ्रमणभाष केल्याचे भासवून ‘या प्राध्यापिका माझ्याविषयी अमुक-अमुक सांगत आहेत, याविषयी घरी आल्यावर बोलू’, असे म्हणालो. यानंतर संबंधित प्राध्यापिकेने माझ्याकडे अशा विषयांवर कधी वाच्यता केली नाही.

६ ऊ. एका महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे एक युवा प्राध्यापक एम्.ए. इंग्रजी भाषेच्या वर्गातील विद्यार्थिनींच्या एका गटाला मुद्दाम स्वतंत्र जादा तासांसाठी बोलावत असत. याविषयी ते अन्य समवयस्क प्राध्यापकांशी चर्चा करत असतांना मी तेथे पोचलो. तेव्हा ते विषय पालटत असल्याचे मला २-३ वेळा लक्षात आले.

६ ए. एका महाविद्यालयात एका विषयाचे विभागप्रमुख आणि अन्य एका विषयाच्या माजी विभागप्रमुख यांच्यात विवाहबाह्य संबंध होते. त्यांना मोकळीक मिळावी, यासाठी ते मे मासात त्यांच्याशी संबंधित विद्यापिठात उत्तरपत्रिका तपासण्यासाठी न जाता अन्य विद्यापिठांतर्गत दुसर्‍या शहरात जाऊन उत्तरपत्रिका तपासण्याच्या कारणाने एकत्र रहात असत.

प्रा. महावीर श्रीश्रीमाळ

७. राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत काम करतांना आलेले वाईट अनुभव

७ अ. राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत १० दिवसांसाठी (सध्या ७ दिवसांसाठी) बाहेरगावी विशेष शिबिर आयोजित करण्यात येते. मी विद्यार्थी असतांना एका महाविद्यालयाच्या शिबिरस्थळी युवकांच्या तात्पुरत्या उभारलेल्या प्रसाधनगृहात मद्याच्या बाटल्या आढळून आल्याचे पाहिले होते. त्या वेळी कार्यक्रमाच्या अधिकार्‍याने (प्राध्यापकाने) मुलांसमवेत मद्यपान केल्याचे समजले.

७ आ. एका महाविद्यालयाच्या शिबिराला भेट देण्यास आलेल्या एका प्राध्यापकाने सकाळी चहाचे पातेले उचलण्यासाठी तेथे असलेल्या युवतीकडे तिची ओढणी मागितली. त्यामुळे शिबिरातील वातावरण तणावाचे झाले. त्यामुळे त्या प्राध्यापकांना तेथून रवाना करावे लागले.

७ इ. एका महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिराला एका महिला समन्वयकांनी एका विद्यार्थ्यासमवेत दुचाकीवर येऊन भेट दिली. तेव्हा काही शिबिरार्थींनी तो युवक मद्यपान करून आल्याचे मला सांगितले. त्या वेळी त्याच्यासह मी मुद्दाम जेवणासाठी बसलो. त्याने खरेच मद्यपान केल्याचे लक्षात आले.

८. शिक्षकेतर सेवकांची असलेली चुकीची आणि लोभी मानसिकता !

८ अ. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील राहिलेले अन्नधान्य शिक्षकेतर सेवक यांनी २ आठवडे दुकानात जमा करण्यास चालढकलपणा केला. ‘ते उंदरांनी खाल्ले’, असे खोटे सांगून त्यांनी ते बरेचसे स्वत:कडे ठेऊन घेतले आणि किरकोळ दुकानात जमा केले.

८ आ. महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेच्या विविध प्रयोगशाळेत गॅस सिलिंडरची आवश्यकता असते. रविवारी महाविद्यालयाला सुटी असल्याचा अपलाभ उठवून लिपिक आणि अन्य सेवक हे सिलिंडर वापरण्यास देऊन त्यापासून पैसे मिळवत.

८ इ. एका शाखेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी ‘वेलकम पार्टी’ (स्वागताची मेजवानी) आयोजित केली होती. ती दुपारी ४ वाजल्यानंतर संपली. त्यानंतर शिक्षकेतर सेवकांनी आवराआवर केली. तेव्हा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी शीतपेयात मद्य मिसळून मद्यपान केले, तसेच ‘आयोजकांपैकी एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आवारात हातात हात घालून सायंकाळपर्यंत बसले होते’, असे त्यांनी प्राचार्यांना सांगितले. याविषयी प्राचार्यांनी नक्की काय झाले ? ते पहाण्यास सांगितले. ‘मद्याचे साफ खोटे आहे. कार्यक्रमानंतर आम्ही दोघे काही वेळ बोलत होतो. तुम्ही ‘सीसीटीव्ही फूटेज’ तपासू शकता’, असे त्या विद्यार्थ्यांनी सांगितले. वस्तूत: कार्यक्रमानंतर नेहमीच्या वेळेपेक्षा एक-दीड घंटे अधिक थांबावे लागले होते. यापुढे तसे होऊ नये; म्हणून शिक्षकेतर सेवकांनी तशी आवई उठवली होती.

८ ई. महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी आलेल्या अतिथींना न्याहारी वाढण्याच्या वेळेत नियोजित सेवक जाणीवपूर्वक पसार झाले. त्यामुळे ‘अतिथी देवो भव: ।’ असे म्हणत मी अतिथींना न्याहारी वाढण्यास आरंभ केला. तेव्हा दूर अंतरावरून गंमत पहाणार्‍या त्या सेवकांनी येऊन अतिथींना वाढले.

८ उ. एका महाविद्यालयातील प्राध्यापकांना मद्यपान आणि जुगार यांचे व्यसन होते. त्यांच्या खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता. तेव्हा त्यांनी बागायती शेती असलेल्या शिक्षकेतर सेवकांकडून व्याजावर पैसे घेतले होते. अशा सेवकांपुढे ते प्राध्यापक दबून रहात असत.

९. कृतज्ञता

देशाचे आधारस्तंभ घडवणार्‍या शिक्षणक्षेत्रातील ही उदाहरणे संबंधित व्यक्तींच्या विरोधात नव्हे, तर केवळ समाज आणि राष्ट्र यांच्या हितापोटी मांडली आहेत. ‘अनीती आणि असंवेदनशीलता यांमुळे काही अपवाद वगळता आपल्याच कोषात रहाणार्‍या शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींच्या या बजबजपुरीत गुरुकृपेने होत असलेल्या साधनेमुळे माझा निभाव लागला. केवळ साधनेसाठी देवाने यातून सुखरूप बाहेर काढले’, अशी जाणीव मागे वळून पहातांना होते. हे गुरुमाऊली, शिक्षकी पेशा आवडीचा असतांना एका महाविद्यालयात पालट करण्याहून सर्वांगीण समाजात पालट करण्यासाठी साधना करणे अत्यावश्यक आहे, हे तुमच्या कृपेनेच लक्षात आले आणि पूर्णवेळ धर्मप्रसार करण्याचा निर्णय घेता आला. याविषयी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञता !

– प्रा. महावीर श्रीश्रीमाळ, फोंडा, गोवा.

(समाप्त)

शिक्षणक्षेत्रातील चांगले आणि कटू अनुभव आले असल्यास ते आम्हाला अवश्य पाठवा !

या लेखानुसार शिक्षणक्षेत्रासंदर्भात चांगले अथवा कटू अनुभव आले असल्यास आम्हाला अवश्य कळवा. हे अनुभव प्रसिद्ध करतांना तुमचे नाव पाहिजे असल्यास गोपनीय ठेवू.

सुराज्य अभियान

टपालाचा पत्ता – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, ‘मधुस्मृती’ घर क्र. ४५७, पहिला मजला, बैठक सभागृह, सत्यनारायण मंदिराजवळ, ढवळी, फोंडा, गोवा – ४०३४०१

संपर्क : 9595984844

संगणकीय पत्ता – [email protected]