२.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल षष्ठी) या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने…
२.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल षष्ठी) या दिवशी देवद पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे यांचा ६० वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने २.९.२०२२ या दिवशी आपण त्यांच्या पत्नी सौ. मीनल राजेंद्र शिंदे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कु. गुलाबी धुरी यांना जाणवलेली सद्गुरु राजेंद्रदादा यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/609516.html
‘एकदा सद्गुरु राजेंद्र शिंदे रामनाथी, गोवा येथून देवद, पनवेल येथील आश्रमात जातांना कुडाळ सेवाकेंद्रात २ दिवस निवासाला होते. त्या वेळी मला त्यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन येथे दिले आहे.
१. स्वभाषाभिमान
१ अ. भांड्याच्या मांडणीवर ‘डिश’ असे इंग्रजीत लिहिलेले पाहून त्वरित त्यासाठी ‘ताटल्या’ हा मराठी शब्द सांगून इंग्रजी शब्द पालटायला सांगणे : कुडाळ सेवाकेंद्रात भांडी ठेवण्यासाठी एक मांडणी आहे. त्यात ‘कुठली भांडी कुठे ठेवावीत ?’, हे समजण्यासाठी त्यावर त्या त्या जागी ‘वाडगी’, ‘पेले’, ‘तांब्या’ आणि ‘अल्पाहाराच्या ‘डिश’, असे लिहिले आहे. सद्गुरु राजेंद्रदादांचे त्याकडे लक्ष गेले. ते मला म्हणाले, ‘‘सर्व शब्द मराठी आहेत; पण ‘डिश’, हा इंग्रजी शब्द का ? सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रात इंग्रजी भाषा कशी
काय ? तिथे ‘ताटल्या’, असा शब्द करायला हवा.’’ तेव्हा त्यांना असलेला मातृभाषेचा अभिमान माझ्या लक्षात आला.
२. साधकांना प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक आणि काटकसरीने वापरण्याविषयी सांगणे
२ अ. ‘नळ चालू केल्यावर पाणी फार जोरात येऊन ते वाया जाते’, हे पाहून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यावर त्वरित उपाययोजना काढायला सांगणे : एकदा आमचे जेवण झाल्यानंतर आम्ही ताट धुण्यासाठी नळ चालू केल्यावर पुष्कळ जोरात पाणी आले आणि पाणी वाया गेले. सद्गुरु दादांच्या ते लक्षात आले. त्यांनी एका साधकाला सांगितले, ‘‘नळातून पुष्कळ जोरात पाणी आल्यामुळे पुष्कळ पाणी वाया जाते. त्यामुळे लवकरच त्यावर उपाययोजना काढायला हवी.’’
२ आ. ते म्हणाले, ‘‘साधकांनी वीज आणि पाणी यांचा वापर काळजीपूर्वक करायला हवा.’’
३. सेवाकेंद्रातील कार्यपद्धतीच्या पालनाविषयी जागरूकता आणि तत्त्वनिष्ठता !
३ अ. महाप्रसाद घेण्याची वेळ टळूनही साधक महाप्रसादाला न गेल्यावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांना सेवाकेंद्राची कार्यपद्धत न पाळल्याची चूक लक्षात आणून देणे : एकदा आम्ही सेवा करत असतांना जेवणाची वेळ टळून गेली होती. सद्गुरु राजेंद्रदादांचे जेवण झाल्यानंतर ते संबंधित साधकांकडे गेले आणि म्हणाले, ‘‘जेवणाची वेळ होऊन गेली, तरी तुम्ही जेवायला गेला नाहीत. साधकांनी वेळेतच महाप्रसाद घ्यायला हवा. साधकांना तातडीची सेवा असल्यास त्यांनी तसा निरोप स्वयंपाकघरात सेवा करणार्या साधिकांना द्यायला हवा.’’
३ आ. धान्य निवडण्याची कार्यपद्धत कारणासहित सांगणे
३ आ १. एक धान्य एकाच साधिकेने निवडल्यास त्यात एखादा खडा राहू शकणे, ‘धान्यात एकही खडा राहू नये’, यासाठी तेच धान्य दुसर्या साधिकेने निवडल्यास धान्य पूर्ण स्वच्छ होऊ शकणे : एकदा प्रसारातील साधिका धान्य निवडण्याची सेवा करत होत्या. सद्गुरु राजेंद्रदादांनी त्या साधिकांना विचारले, ‘‘एकच धान्य २ वेगवेगळ्या साधिका निवडतात ना ?’’(म्हणजे एका साधिकेने निवडलेले धान्य पुन्हा दुसरी साधिका निवडते ना ?) त्या साधिकांनी ‘‘नाही’’, असे सांगितले. त्या वेळी सद्गुरु राजेंद्रदादा म्हणाले, ‘‘एखादे धान्य एकाच साधिकेने एकदाच निवडले, तर त्यात एखादा खडा राहून साधकांना त्याचा त्रास होऊ शकतो; म्हणून साधकांनी एकच धान्य २ वेळा निवडले पाहिजे. जेणेकरून त्यात एकही खडा रहाणार नाही.’’
४. ‘साधकांची साधना होऊन त्यांनी लवकर पुढे जावे’, अशी तळमळ
एकदा सद्गुरु राजेंद्रदादांना मी त्यांना भात वाढायला गेल्यावर त्यांनी मला विचारले, ‘‘गुलाबी, तू निळी कधी होणार ?’’ त्या वेळी देवाच्या कृपेने मी लगेच उत्तर दिले, ‘‘सद्गुरु दादा, माझी भक्ती वाढली की, लगेच !’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मलाही हेच उत्तर अपेक्षित होते.’’ ‘साधकांनी साधनेत लवकर पुढे जायला हवे’, अशी सद्गुरु राजेंद्रदादांची तळमळ अधिक आहे’, असे मला वाटले.
५. प्रार्थना
सद्गुरु राजेंद्रदादा केवळ २ दिवसच कुडाळ सेवाकेंद्रात राहिले; परंतु तेवढ्या वेळेत त्यांनी आम्हाला पुष्कळ काही शिकवले. ‘त्यांना सनातनचे सगळेच आश्रम आणि सेवाकेंद्रे आपलेच वाटतात’, हे मला त्यांच्या कृती आणि विचार यांतून शिकता आले. आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत. ‘त्यांच्याप्रमाणे आम्हालाही सर्व आश्रम आपले वाटायला हवेत’, यासाठी ‘आमची भाव आणि भक्ती वाढू दे’, अशी श्री चरणी प्रार्थना !’
– कु. गुलाबी धुरी, कुडाळ सेवाकेंद्र, कुडाळ. (१०.१२.२०२०)