जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ च्या यशस्वीतेसाठी विविध शासकीय विभागाकडे दायित्व देण्यात आले आहे. त्या त्या विभागाच्या अधिकार्यांनी संबंधित कामे वेळेत पूर्ण करून महोत्सव यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले. ३० ऑगस्ट या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्वसिद्धतेविषयी बैठक घेण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शारदीय नवरात्र महोत्सवास १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी प्रारंभ होणार असून ११ ऑक्टोबर २०२२ पर्यंत विविध पूजाविधी होणार आहेत. या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापूर येथे दर्शनासाठी येतात. बैठकीमध्ये महोत्सवाच्या नियोजनासाठी आवश्यक असणार्या सर्व गोष्टींचे नियोजन करण्यात आले असून विविध विभागांकडे दायित्व निश्चित करून देण्यात आले आहे.