देवतांना एकापेक्षा अधिक नावे असतात. त्या नावांमध्ये देवतेचे ते ते वैशिष्ट्य सामावलेले असते. देवतांच्या नावाचा अर्थ जाणून घेतला, तर देवतेची महानता आपल्या लक्षात येते, पर्यायाने देवतेची उपासना करतांना तिच्याविषयीची भावभक्ती वाढते. त्यामुळे देवतेच्या रूपाची, तिच्या नावांची, तिच्याशी संबंधित कथांची माहिती आपल्याला कळली, तर आपल्याला साधनेच्या दृष्टीने त्याचा लाभ होतो. श्री गणेशाच्या विविध नावांचा अर्थ जाणून घेऊ; त्यामुळे त्याची उपासना करतांना आपली त्याच्याविषयीची भक्ती वाढण्यास आपल्याला साहाय्य होईल !
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् । तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च । सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् । एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ – द्वादशनामस्तोत्र
१. वक्रतुंड
सर्वसाधारणतः ‘वक्रतुंड’ म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा, असा अर्थ समजला जातो; पण हा अर्थ योग्य नाही. ‘वक्रान् तुण्डयति इति वक्र-तुण्डः ।’, म्हणजे ‘वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे आणि बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो, तो वक्रतुंड.’ तिर्यक (रज-तम) आणि विस्फुटित (तम-रज), म्हणजे वाकड्या, रज-तमात्मक ३६० लहरींना सोंडेच्या माध्यमातून १०८ लहरींप्रमाणे सरळ, सात्त्विक करतो, तो वक्रतुंड. (२७ नक्षत्रांपासून निघालेल्या २७ लहरींचे अजानजलोकात प्रत्येकी चार चरण (विभाग) होऊन पृथ्वीवर २७ x ४ = १०८ लहरी येतात. शेषापासून निघणार्या लहरींना ‘हिरण्यगर्भलहरी’ म्हणतात. त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर आल्या की, त्यांची संख्या ३६० होत असल्यामुळे त्यांना ‘३६० लहरी’ असे म्हणतात.)
२. एकदंत किंवा एकशृृंग
एकच सुळा अखंड असल्याने (दुसरा तुटलेला असल्याने) हे नाव आहे. दोन सुळ्यांपैकी उजवीकडील सुळा अखंड असतो, तर डावीकडील सुळा तुटलेला असतो.
२ अ. उजवी बाजू ही सूर्यनाडीची आहे. सूर्यनाडी तेजस्वी असल्याने अशा तेजस्वी बाजूकडील सुळा कधीही खंड होऊ शकत नाही.
२ आ. एकदंत हा ‘एक अशा ब्रह्माचा’ निर्देशक आहे.
२ इ. ‘दंत’ हा शब्द दृ-दर्शयति (म्हणजे दाखवणे) या धातूपासून बनला आहे. ‘एक अशा ब्रह्माची अनुभूती येण्याची दिशा दाखवतो, तो एकदंत’, असाही त्याचा अर्थ आहे.
२ ई. मेधा आणि श्रद्धा हे दोन दात होत. मेधा म्हणजे बुद्धी, धारणशक्ती. मेधा हा अपूर्ण दात आणि श्रद्धा हा पूर्ण दात.
३. कृष्णपिंगाक्ष
कृष्ण + पिंग + अक्ष असा हा शब्द बनला आहे. कृष्ण म्हणजे काळा, पिंग म्हणजे धुरकट आणि अक्ष म्हणजे डोळा. काळा पृथ्वीच्या संदर्भात आहे, तर धुरकट मेघांच्या संदर्भात आहे. ‘पृथ्वी आणि मेघ हे ज्याचे डोळे आहेत, म्हणजेच जो पृथ्वी आणि मेघ यांतील सर्व पाहू शकतो’, असा.
४. गजवक्त्र
४ अ. गज म्हणजे मेघ. याला द्यु (देव) लोकाचा प्रतिनिधी मानतात. वक्त्र म्हणजे तोंड. गजवक्त्र म्हणजे द्युलोक हे ज्याचे तोंड आहे, असा (विराट). ‘ॐ’ जर उभा केला, तर तिथे गजवदनाची प्रतीती येते.
४ आ. जिथे सर्वांचा लय होतो, ते तत्त्व आणि ज = ज्याच्यापासून सर्वांचा जन्म होतो, असे तत्त्व; म्हणून गज म्हणजे ‘ब्रह्म’. (मुद्गलपुराण)
५. लंबोदर
लंबोदर हा शब्द लंब (म्हणजे मोठे) अन् उदर असा बनला आहे.
१. तुजमाजी वासु चराचरा । म्हणौनि बोलिजे लंबोदरा ॥
– एकनाथी भागवत, आरंभ, ओवी ३
२. गणपतितंत्रानुसार भगवान शंकराने डमरू वाजवला. डमरूच्या गंभीर नादातून (आवाजातून) श्री गणेशाने वेदविद्या ग्रहण केली. प्रतिदिन तांडवनृत्य पाहून श्री गणपति नृत्यकला शिकला. पार्वतीच्या नूपुर झंकारातून तो संगीत शिकला. इतके विविध प्रकारचे ज्ञान त्याने आत्मसात म्हणजेच उदरस्थ केले; म्हणून त्याचे उदर मोठे झाले.
६. विकट
वि + कृत + अकत (आकुति). वि म्हणजे विशेषकरून, कृत म्हणजे केलेले आणि अकत म्हणजे मोक्ष; म्हणून विकट म्हणजे ‘जो विशिष्ट पद्धतीने लहरी उत्पन्न करून मोक्ष प्रदान करतो, असा.’
७. धूम्रवर्ण
धूम्र म्हणजे धूर. धूर ही घनीकरण होत असतांनाची प्राथमिक अवस्था आहे. घनरूपातील सगुण आणि निर्गुण यांच्या मधली अवस्था म्हणजे धूर. अशा धूम्र वर्णाचा जो आहे, तो धूम्रवर्ण. ‘धूर आहे, तिथे अग्नी आहे’, या नियमानुसार श्री गणपतीत अग्नितत्त्व (अंगार) आहेच.
८. भालचंद्र
भाल म्हणजे भुवयांच्या वरचे डोके. प्रजापति, ब्रह्मा, शिव, श्रीविष्णु आणि मीनाक्षी यांच्यापासून येणार्या लहरी एकमेकांत मिसळून त्यांपासून सहस्रो लहरींचे बरेच समूह निर्माण होतात. प्रजापति, ब्रह्मा, शिव, श्रीविष्णु आणि मीनाक्षी हे निर्गुण आहेत; पण त्यांच्या लहरी गुणमय आहेत. त्यातल्या तीन म्हणजे ममता, क्षमाशीलता आणि वात्सल्य (आल्हाद) या लहरी जेथून निघतात त्याला चंद्र म्हणतात. अशा ‘चंद्रमा’ला ज्याने भाली धारण केले आहे, तो भालचंद्र. मुळात हे नाव शंकराचे; पण शंकराचा मुलगा म्हणून गणपतीलाही हे नाव चिकटले !
९. विनायक
विनायक हा शब्द ‘विशेषरूपेण नायकः ।’ असा बनला आहे. याचा अर्थ – नायकाची, म्हणजे नेत्याची, सर्व वैशिष्ट्ये असलेला, असा आहे. ‘विनायकगणांची ६ ही संख्या सर्वमान्य आहे. मानवगृह्यसूत्र आणि बौधायनगृह्यसूत्र या सूत्रांत विनायकगणांविषयी विवेचन (माहिती) आले आहे, त्याचा सारांश असा – विनायकगण विघ्नकारी, उपद्रवकारी आणि क्रूर असे आहेत. त्यांचा उपद्रव चालू झाला की माणसे वेड्यासारखी वागू लागतात. त्यांना दुष्ट स्वप्ने पडतात आणि सतत भय वाटत रहाते. या विनायकगणांची बाधा नष्ट होण्यासाठी धर्मशास्त्रात अनेक शांतीविधी सांगितले आहेत. श्री गणपति हा विनायक म्हणजेच या विनायकगणांचा अधिपती होय. शंकराने गणपतीला सांगितले, ‘विनायकगण हे तुझे सेवक होतील. यज्ञादी कार्यात तुझी पूजा प्रथम होईल. जो कोणी ती करणार नाही, त्याच्या कार्यसिद्धीत विघ्ने येतील.’ तेव्हापासून कार्यारंभी श्री गणपतिपूजन होऊ लागले. विनायकगण हे विघ्नरूप होते; पण विनायक हा विघ्नहर्ता ठरला. भक्तांना अभिष्टसिद्धी प्राप्त करून देणारा तो सिद्धीविनायक ठरला.’
१०. चिंतामणि
‘क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध अशा चित्ताच्या पाच भूमिका आहेत. त्यांना प्रकाशित करणारा, तो चिंतामणि होय. चिंतामणीच्या भजनाने चित्तपंचकाचा नाश होऊन पूर्ण शांतीचा लाभ होतो.’ – मुद्गलपुराण
(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ‘श्री गणपति’)