टोमॅटो ५०० रुपये, तर कांदे ३०० रुपये किलो !

पाकमध्ये पुरामुळे महागाईत प्रचंड वाढ !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये जवळपास ७० टक्के भागामध्ये पूर आल्यामुळे १ सहस्रांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहस्रो कोटी रुपयांची हानी झाली आहे. यामुळे पाकमध्ये महागाईमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. पाकच्या लाहोर शहरामध्ये भाज्यांचे भाव प्रचंड वाढले आहेत. टोमॅटोची किंमत प्रति किलो ५०० रुपये (पाकिस्तानी रुपयात) झाल्याचे समजते. कांदा ३०० रुपये किलो, तर लिंबू ४०० रुपये किलो दराने विकला जात आहे. मुळात पाकिस्तान सरकारकडून टोमॅटोची किंमत ८० रुपये, तर कांद्याची किंमत ६१ रुपये किलो होती; पण खाजगी विक्रेते सध्या या भाज्या ५ पट भावाने विकत आहेत. या दरवाढीविषयी दुकानदार म्हणत आहेत की, घाऊक बाजारातून चढ्या दराने भाजीपाला खरेदी करत असल्याने आम्हालाही भाव वाढवावे लागले आहेत.

पुरामुळे सिंध आणि पंजाब प्रांतात ऊस आणि कापूस पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत, तर कांदा, टोमॅटो आणि खरीप मिरचीची अंशतः हानी झाली आहे. सिंधमधील सरकारी गोदामांमध्ये साठवलेला किमान २० लाख टन गहू पाऊस आणि पूर यांच्यामुळे  खराब झाला आहे, ज्यामुळे देशाच्या अन्न सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.