सोनाली फोगाट हत्या प्रकरणी पाचवा संशयित पोलिसांच्या कह्यात !

आवश्यकता भासल्यास अन्वेषण ‘सी.बी.आय्.’कडे सुपुर्द करण्याची सरकारची सिद्धता : मुख्यमंत्र्यांचा दावा

डावीकडून सोनाली फोगाट, डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २८ ऑगस्ट (वार्ता.) – अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येच्या प्रकरणी पाचवा संशयित रामदास मांद्रेकर याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. हॉटेलचा कर्मचारी तथा संशयित दत्तप्रसाद गावकर याला रामदास मांद्रेकर यानेच मेथाफेटामाईन (एम्.एम्.डी.ए.) हे घातक अमली पदार्थ पुरवले होते, असे पोलीस अन्वेषणात समोर आले आहे. रामदास मांद्रेकर याने गुन्ह्यांची स्वीकृती दिल्याची माहिती हणजुणे पोलिसांनी दिली. रामदास मांद्रेकर याला कुणी अमली पदार्थ पुरवले याचा पोलीस शोध घेत आहेत.

‘कर्लिस’ उपाहारगृहाच्या मालकाला जामीन नाकारला

हणजुणे येथील कर्लिस उपाहारगृहात पेयातून विषारी द्रव्य देऊन सोनाली फोगाट यांची हत्या करण्यात आली. कर्लिसचे मालक एडवीन न्युनीस याला पोलिसांनी यापूर्वीच कह्यात घेतले आहे. एडवीन न्युनीस याचा जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे, तसेच न्युनीस याला ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. प्रकरणातील प्रमुख संशयित सुधीन संगवान याला उपाहारगृहात अमली पदार्थ पुरवणारा उपहारगृहाचा कर्मचारी दत्तप्रसाद गावकर याला म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

‘कर्लिस’ उपाहारगृहाचा मालक एडवीन न्युनीस नव्हे ! – अधिवक्त्याचा दावा

एडवीन न्युनीस हे ‘कर्लिस’ उपाहारगृहाचे कायदेशीरदृष्ट्या मालक नाहीत आणि यामुळे त्यांना कह्यात घेणे अयोग्य आहे. या प्रकरणी न्यायासाठी ‘नार्काेटीक्स ड्रग्स अँड सायकोट्रोपीक सब्स्टान्सिस’ न्यायालयात जाणार आहे, असा दावा एडवीन न्युनीस यांच्या अधिवक्त्याने पणजी येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला.

..तर प्रकरण ‘सी.बी.आय्.’ला सोपवू ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

सोनाली फोगाट प्रकरण आवश्यकता भासल्यास ‘सी.बी.आय्.’ या केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला सुपुर्द करण्यास गोवा सरकार सिद्ध आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी माझ्याशी संपर्क साधून या प्रकरणी सखोल अन्वेषण करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी ‘सी.बी.आय्.’च्या माध्यमातून अन्वेषण करण्यावरही चर्चा झाली आहे. आज सर्व सोपस्कर पूर्ण करून आवश्यकता भासल्यास प्रकरण ‘सी.बी.आय्.’कडे सुपुर्द करण्यात येईल. गोव्यात पर्यटनाला प्राधान्य दिले जाते; मात्र येथे अमली पदार्थाला कोणत्याही प्रकारे थारा दिला जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंबेगाळ, पाळी येथे प्रसारमाध्यमाशी बोलतांना ही माहिती दिली.