शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात फुले, हार आणि प्रसाद पूर्वीप्रमाणे नेता येण्यासाठी शिर्डीत आंदोलन !

साईबाबांच्या मंदिरात फुले, हार, प्रसाद यांना बंदी घातल्याचे प्रकरण

सामाजिक कार्यकर्त्यांचे ३ दिवस उपोषण !

आंदोलन करताना सामाजिक कार्यकर्ते

शिर्डी (जिल्हा नगर) – कोरोना महामारीनंतर मंदिरे भाविकांसाठी बंद झाली. तेव्हापासून शिर्डी साईबाबा संस्थान विश्‍वस्त मंडळाच्या वतीने ठराव करत साईमंदिरात भाविकांना हार, फुले, प्रसाद घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली. आता निर्बंध हटल्याने फुले, हार आणि प्रसाद पूर्वीप्रमाणे नेता यावे, ही मागणी करत कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. आता पुन्हा हीच मागणी करत शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांनी साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरासमोर गेल्या ३ दिवसांपासून उपोषण चालू केले आहे. २६ ऑगस्ट या दिवशी उपोषणाचा चौथा दिवस होता.

१. दिगंबर कोते म्हणाले, ‘‘गुलाबाचे गुच्छ घेऊन भाविक दर्शन रांगेत गेला, तर त्याच्याकडील पूजासामान संस्थानच्या सुरक्षारक्षाकाकडून काढून घेतले जाते. त्यामुळे भाविकांना साईदर्शनाचे पुरेपूर समाधान मिळत नाही. साई मंदिरात फुले आणि हार नेण्यावर बंदी असल्याने परिसरातील फुले उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिक यांमुळे अडचणीत आले आहेत. कोरोनाच्या २ वर्षांत शिर्डीचे आर्थिक समीकरण बिघडले असून त्यात बंदी आणि नियम यांमुळे अडचण निर्माण होत आहे.

२. यावर साईसंस्थानचे विश्‍वस्त डॉ. एकनाथ गोंदकर म्हणाले, ‘‘भाविकाची श्रद्धा आणि भावना यांचा आधार घेऊन फुले, हार आणि प्रसाद अशा पूजासाहित्याच्या माध्यमातून त्यांना फसवले जाते. २०० रुपयांच्या फूलमाळा २ सहस्र रुपयांना विकून भाविकांची लुबाडणूक केल्याच्या अनेक तक्रारी साईसंस्थानला प्राप्त झाल्या आहेत. तसेच साई समाधीवर चढवलेली फुले पायदळी येऊन मंदिरात फुलांचा एकप्रकारे चिखल होत होता. त्याच्या स्वच्छतेसाठी अतिरिक्त वेळ लागतो. हे टाळल्यामुळे भाविकांचे दर्शन वेळेवर होत आहे. यासाठीच फुले, प्रसाद, हार आणि नारळ यांच्या बंदीचा निर्णय घेतला आहे. (‘रोगापेक्षा इलाज भयंकर’, यातलाच हा प्रकार होय. या स्पष्टीकरणावर कोण विश्‍वास ठेवणार ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम आहे. हिंदूंच्या मंदिरात हिंदूंच्याच देवासाठी हार, फुले नेता न येणे, हे दुर्दैवी आहे. अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असा प्रकार करण्याचे धारिष्ट्य झाले असते का ?
  • कोरोना महामारीनंतर राज्यातील सर्वच प्रकारचे निर्बंध उठवले जात आहेत. मंदिर प्रशासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे हिंदूंना वाटते !