महाराष्ट्रातील सर्वच आश्रमशाळा आणि वसतीगृह यांच्या चौकशीचे आदिवासी विकासमंत्र्यांचे आदेश !

नवी मुंबईतील चर्चप्रणीत आश्रमशाळेत मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण !

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना निवेदन देताना हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट (उजवीकडे )

मुंबई – नवी मुंबईतील ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’ या चर्चच्या अंतर्गत असलेल्या आश्रमशाळांमध्ये अनेक अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींना अटक करण्यात आली असली, तरी अशा प्रकारच्या घटना अन्य सर्वच चर्चप्रणीत आश्रमशाळा आणि वसतीगृहे यांमध्ये होत नाही ना, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी आदिवास विकास विभागाच्या राज्याच्या सचिवांना राज्यातील सर्वच आश्रमशाळा आणि वसतीगृहे यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

१. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना समोर आली. नवी मुंबईतील ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या चर्च अंतर्गत असलेल्या आश्रमशाळेत अनेक मुलींवर तेथील फादर येशूदासनने लैंगिक अत्याचार केले आहेत. याविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

२. नवी मुंबईतील फादर येशूदासन याच्यासह अन्य जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा चर्चप्रणीत आश्रमशाळांची नोंदणी रहित करणे, त्यांची चौकशी करण्यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, पोलीस यांच्या महिला प्रतिनिधींची एक समिती नेमण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

३. ‘राज्यात आदिवासींचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत आहे. पालघर जिल्ह्यासह अहमदनगर आणि संभाजीनगर जिल्ह्यांत धर्मांतराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीने वर्ष २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनाला धर्मांतरविरोधी कायदा करण्याची शिफारस केली आहे. त्याची कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्याची मागणीही आदिवासी विकासमंत्र्यांंनी मान्य केली. या वेळी आदिवासींचे धर्मांतर होऊ नये, तसेच आदिवासींना आर्थिक साहाय्य करण्यासाठी आदिवासी विभाग प्रयत्नशील असेल’, असेही मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.