रामदेवबाबा जे सांगतात त्याचे अनुसरण करून लोक बरी होतील, याची काय निश्‍चिती ? – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – योगऋषी रामदेवबाबा यांनी योग प्रसिद्ध केला. ही चांगली गोष्ट आहे; मात्र त्यांनी अन्य यंत्रणांवर टीका करणे योग्य नाही. रामदेवबाबा जे सांगतात त्याचे अनुसरण करून लोक बरी होतील, याची काय निश्‍चिती ? रामदेवबाबा यंत्रणांना दूषणे का देत आहेत ?, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने विचारला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या संदर्भात उत्तर सादर करण्याचे निर्देश देत नोटीस बजावली आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने योगऋषी रामदेवबाबा यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली असून यामध्ये, ‘कोरोना लसीकरण आणि आधुनिक वैद्यकीय पद्धत यांना दूषणे देणारी एक मोहीम चालवली जात आहे’, असे म्हटले आहे.

याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता प्रभास बजाज यांनी न्यायालयात युक्तीवाद सादर करतांना म्हटले की, रामदेवबाबा यांचे म्हणणे आहे, ‘अ‍ॅलोपथी औषधे घेऊनही डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जर या सूत्रांवर खुलासा झाला नाही, तर त्याचा जनमानसावर वाईट परिणाम होईल.’ यावर न्यायमूर्ती रविकुमार म्हणाले, ‘‘असे दिसून येते की, अ‍ॅलोपथी उपचारांची थट्टा उडवली जात आहे.’’