साधकांचा आधारस्तंभ आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आनंददायी सद्गुरु सन्मान सोहळा !

उत्तर भारतासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही धर्मप्रसाराचे कार्य अत्यंत तळमळीने करणारे, प्रेमभावाने हिंदुत्वनिष्ठांनाही आपलेसे करणारे, विनम्र वृत्तीचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता २९.६.२०२२ या दिवशी एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली. या सोहळ्याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध करत आहोत.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

अशी झाली आनंददायी घोषणा !

रामनाथी येथे झालेल्या एका भावसोहळ्यात पू. नीलेश सिंगबाळ यांनी वाराणसी आश्रमात झालेले विविध बुद्धीअगम्य पालट, साधकांना येत असलेल्या विविध अनुभूती आदी सूत्रे अत्यंत भावपूर्ण रितीने सांगितली. साधकांना वाराणसी आश्रमाच्या भावविश्वात नेणारे त्यांचे भावमय बोल ऐकून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्याचे विश्लेषण केले. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘वाराणसी आश्रमाच्या परिसरातील निसर्गातील पालट ऐकल्यानंतर ‘रामायण-महाभारत काळातील वातावरण तेथे निर्माण झाले आहे’, असे वाटते. वास्तूत सगुणातून परिवर्तन घडून येण्यामागे तेथील अधिष्ठानाचे अधिक महत्त्व असते. पू. नीलेश सिंगबाळ हे वाराणसी आश्रमाचे अधिष्ठान आहेत. त्यांच्यातील चैतन्याचे प्रक्षेपण वास्तूत होऊन आश्रमाचा परिसर, तेथील निसर्ग, आश्रमाची वास्तू आणि साधक यांमध्ये परिवर्तन घडून आले आहे. वास्तू आणि साधक यांच्यात जाणवत असलेल्या परिवर्तनातून दिसून येत आहे की, पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदावर विराजमान झाले आहेत.’’

ही आनंदवार्ता ऐकून सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे हात आपोआपच जोडले गेले. त्यासह त्यांच्यासमवेत सेवा करणार्‍या साधकांनाही भावाश्रू अनावर झाले.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदी विराजमान झाल्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांचा सन्मान केला. त्यानंतर त्यांनी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला. त्यानंतर सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेली आपली पत्नी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला. या वेळी त्यांच्यातील उच्च भावाचे दर्शन साधकांना घडले !
सद्गुरु नीलेश सिंगबाळ (उजवीकडे) यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

धर्मकार्याची तीव्र तळमळ असणारे आणि सहजावस्थेत रहाणारे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरु पदावर विराजमान !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मूळचे गोवा येथील पू. नीलेश सिंगबाळ यांनी वर्ष १९९६ मध्ये साधनेला आरंभ केला. आज्ञापालन, स्वतःला पालटण्याची तळमळ आणि त्याग या गुणांमुळे त्यांनी वर्ष १९९९ पासून पूर्णवेळ साधनेला आरंभ केला.

वर्ष २००४ मध्ये ते उत्तर भारतातील वाराणसी येथे सेवेसाठी गेले. वाराणसीतील प्रतिकूल परिस्थितीत रहाणे कठीण असतांना देवावरील श्रद्धेमुळे त्यांनी ‘ही कर्मभूमी स्वतःच्या प्रगतीला पोषक आहे’, असा दृष्टीकोन ठेवला आणि सकारात्मक राहून सेवा केली. वाराणसी आश्रमात राहून तेथील आश्रमजीवनाचा त्यांनी साधनेसाठी पुरेपूर लाभ करून घेतला. आरंभी आश्रमात साधकसंख्या अल्प होती. तेव्हा त्यांनी ‘दिसेल ते कर्तव्य’ हा दृष्टीकोन ठेवून तेथील सर्व प्रकारच्या सेवा आनंदाने आणि कृतज्ञताभावात राहून केल्या. यातून त्यांची ध्येयनिष्ठता आणि सेवाभावी वृत्ती दिसून येते. या सगळ्यांतून त्यांचे मन आणि बुद्धी यांचे अर्पण होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती झपाट्याने होऊ लागली अन् वर्ष २०१२ मध्ये त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली.

साधकांना साधनेत साहाय्य करतांनाच धर्मकार्याची तीव्र तळमळ असल्याने त्यांनी हिंदूंचे संघटन होण्यासाठीही तळमळीने प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पूर्वाेत्तर भारतातील हिंदु जनजागृती समितीचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढू लागले. तत्त्वनिष्ठता, सेवेतील परिपूर्णता, प्रीती, अहंशून्यता आदी गुणांमुळे वर्ष २०१७ मध्ये ते संतपदी विराजमान झाले.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदू संघटनांचे संघटन करणे आणि साधकांना साधनेत मार्गदर्शन करणे, हे त्यांचे कार्य व्यापक प्रमाणावर अन् अविरतपणे चालू आहे. वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेला त्यांची आध्यात्मिक पातळी ७८ टक्के होती आणि आजच्या शुभदिनी ८१ टक्के पातळी गाठून ते ‘समष्टी सद्गुरु’ म्हणून सद्गुरु पदावर विराजमान झाले आहेत.

त्याग आणि समर्पण यांचा आदर्श असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे संपूर्ण कुटुंबच आदर्श आहे. त्यांच्या मातोश्री श्रीमती सुधा सिंगबाळ संतपदावर विराजमान आहेत. त्यांच्या पत्नी  श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सर्व साधकांच्या साधनेचा मोठा आधारस्तंभ असून भारतभरातील साधकांना त्या साधनेविषयी मार्गदर्शन आणि साहाय्य करतात. त्यांचा मुलगा श्री. सोहम् (वय २४ वर्षे) सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून साधना करतो.

‘६१ टक्के ते ८१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे’, असा प्रवास अवघ्या १० वर्षांत करणार्‍या सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची पुढील आध्यात्मिक प्रगतीही शीघ्र गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.६.२०२२)    


सन्मान सोहळ्यात कुटुंबियांनी कथन केलेली सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची गुणवैशिष्ट्ये !

 उच्च समष्टी भावामुळे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची अल्प कालावधीत प्रगती झाली ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या पत्नी)

अ. ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी मला पहिल्यापासूनच साधनेत पुष्कळ साहाय्य केले आहे. गृहस्थ जीवनातही त्यांनी माझ्याकडून कोणतीही अपेक्षा केली नाही. पूर्वी मी गोवा राज्यात प्रसारसेवा करत होते. तेव्हाही त्यांनी मला सेवेत साहाय्य केले. मी केवळ त्यांच्यामुळे साधना करू शकले.

आ. ते प्रत्येक प्रसंगात स्थिर असतात. कधी घरात कठीण प्रसंग निर्माण झाला, तरी त्याही स्थितीत ते पुष्कळ स्थिर रहातात.

इ. सद्गुरु नीलेश सिंगबाळ त्यांचे प्रसारक्षेत्र आणि वाराणसी आश्रम यांच्याशी एकरूप झालेले असतात. आपण त्यांना अन्य विषय सांगितले, तरी ते त्याविषयी १-२ वाक्ये बोलतात आणि लगेच साधनेकडे वळतात. त्यांच्यात असलेल्या समष्टी भावामुळे त्यांनी अल्प काळात पुष्कळ प्रगती केली.

ई. आज या भावसोहळ्यातही शांतीची अनुभूती आली. या सोहळ्यात तपोलोकातील वातावरण अनुभवता येत आहे. या सोहळ्याला ऋषि-मुनींची सूक्ष्मातून उपस्थिती जाणवत आहे.

‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याप्रमाणे त्यांच्या प्रसारक्षेत्रातील साधकांचीही आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करते !’

खुर्चीत बसलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, उभे असलेले श्री. सोहम् सिंगबाळ

अध्यात्मात उन्नती केलेल्या स्वतःच्या पत्नीकडून शिकण्याच्या स्थितीत असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

‘सद्गुरु बाबांचा आईविषयी (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी) पुष्कळ भाव आहे. मागे परात्पर गुरुदेवांनी त्यांना आईकडून शिकायला सांगितले. तेव्हा आईची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती. तेव्हापासून ते सातत्याने आईकडून शिकण्याच्या स्थितीत रहातात. पुढे आईने संतपद प्राप्त केले. पुढे सद्गुरुपदी विराजमान झाली आणि नंतर सप्तर्षींनी आईचे अवतारत्व उलगडले. अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर बाबांचा आईविषयी तसाच भाव असे. ते तिच्याशी भ्रमणभाषवर बोलत असतांना किंवा प्रत्यक्ष बोलत असतांनाही त्या भावानेच बोलत असत. आता ते आईशी बोलत असतांना ‘साक्षात् भगवंताशी बोलत आहोत’, इतके भावपूर्ण बोलत असतात.’

– श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ

साधकांची साधना होण्यासाठी प्रयत्न करणारे सद्गुरु बाबा ! – श्री. सोहम सिंगबाळ (सद्गुरु सिंगबाळ यांचा मुलगा)

अ. मी लहान असतांनाच सद्गुरु बाबा धर्मप्रसाराच्या सेवेसाठी वाराणसीला सेवेला गेले. ‘ते मला गुरुचरणांवरच सोडून गेले आहेत’, असे मला जाणवते; कारण त्यांना माझी कधीही काळजी वाटत नसे. माझ्या साधनेसाठी ते आरंभीपासूनच पूरक राहिले.

आ. सद्गुरु बाबांना वाराणसी आश्रम आणि पूर्वाेत्तर भारतातील साधक प्रिय आहेत. वर्ष २०१५ मध्ये पाठदुखीच्या कारणाने त्यांना काही मास गोव्यात राहून उपचार घ्यावे लागले. तेव्हाही ते केवळ शरिराने गोव्यात होते; परंतु त्यांच्या मनात सातत्याने वाराणसीच्या साधकांचेच विचार असायचे. त्यांना स्वतःच्या घरापेक्षाही अधिक वाराणसी आश्रमातील साधक आणि त्यांची साधना चांगली होण्यासाठीचे प्रयत्न यांविषयीच ध्यास असतो. वाराणसी येथे असतांनाही ते तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करतात.

इ. पाठदुखीमुळे ‘२-३ मास उपचारांसाठी द्यावे लागले’, असे वाटत होते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, त्यांची २-३ वर्षांची साधना या २-३ मासांत झाली. त्यांनी आजारपणातही इतके तळमळीने प्रयत्न केले होते !

ई. आई-बाबा यांच्या समर्पणामुळे मी घरी असतांनाही मला ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ याची प्रचीती आली. पूर्वी मी घरी असतांनाही ‘भगवंतच माझी काळजी घेत आहे’, याची मी वेळोवेळी अनुभूती घेतली आहे.

उ. सद्गुरु बाबा गोवा येथे आले, तरी सेवांच्या व्यस्ततेमुळे त्यांचे त्यांच्या आईसमवेत, म्हणजे माझ्या आजीसोबत फार बोलणे होते, असे नाही. त्यांचा जो काही सहवास लाभतो, त्यातून आता आजीलाही त्यांची आंतरिक साधना जाणवते. त्यांच्यातील गुरुसेवेविषयीचा भाव आणि तळमळ हे आजीलाही जाणवतात.(२९.६.२०२२)


सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे मनोगत

सद्गुरु आणि संत यांचे मार्गदर्शन घेऊन प्रयत्न केल्यानेच साधनेत प्रगती होते !

१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यामुळे उत्तर भारतातील धर्मप्रसार कार्याचे अध्यात्मीकरण झाले ! : मी जेव्हा उत्तर भारतात सेवेसाठी गेलो होतो, तेव्हा मला वाराणसी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी ‘माझ्यात दायित्व घेऊन सेवा करण्याइतकी पात्रता होती; म्हणून मला तिकडे पाठवले’, असे नव्हते, तर ‘मला शिकता यावे’, यासाठी उत्तर भारतात धर्मप्रचाराचे कार्य करण्यास सांगण्यात आले. सद्गुरु डॉ. पिंगळेकाका धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी उत्तर भारतात आले. त्यानंतर उत्तर भारताचे अध्यात्मीकरण चालू झाले. आमचे आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न चालू झाले. त्यांच्याकडून पुष्कळ शिकता आले. माझ्यात आढावा न देणे, हा दोष होता. सद्गुरु काका यांनी जाणीव करून दिल्यामुळे त्यावर प्रयत्न करता आले.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून साधनेचे अमूल्य मार्गदर्शन : ‘मी परिपूर्ण नाही. मला प्रयत्न करायचे आहेत’, असा भाव मनात असतो. साधनेच्या दृष्टीने मी मध्ये मध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून मार्गदर्शन घेतो. मला त्यांच्या प्रती कृतज्ञता वाटते. ‘त्यांच्याकडून साधनेचे मार्गदर्शन लाभले नसते, तर माझ्या साधनेची दिशा काय असली असती’, असे वाटते. सद्गुरु आणि संत यांचे मार्गदर्शन घेतल्यानंतरच साधनेत प्रगती होते.

३. साधकांच्या तळमळीमुळे प्रसारकार्य वाढत असल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता ! : गुरुदेवांनी किती चांगले साधक दिले आहेत ! आपले सर्व साधक ही अनमोल रत्ने आहेत ! सर्व साधकांच्या तळमळीमुळे तेथील प्रसारकार्य वाढत आहे. स्वतःच्या बळावर एकट्याने काही करणे कठीण आहे. ‘एकटा काही करू शकतो’, अशी स्थितीही नाही. त्यामुळे सर्व साधकांप्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता  !

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/606874.html

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक