टीईटी घोटाळा प्रकरण
नाशिक – राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळा प्रकरणात नाशिक जिल्ह्यातील ३९ बनावट शिक्षकांचा समावेश आहे. ‘टीईटी’च्या घोटाळ्यात बनावट प्रमाणपत्र असणार्या विद्यार्थ्यांची सूची घोषित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून ७ सहस्र ८८० बनावट शिक्षकांची नावे घोषित करण्यात आली असून त्याची सूची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकार्यांकडे पाठवण्यात येणार आहे. या शिक्षकांचे वेतन बंद करण्यात आले असून बनावट शिक्षकांची सूची माध्यमिक वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाने प्रसिद्ध केली आहे. बनावट शिक्षकांची नेमणूक रहित करण्यात आली आहे.
सौजन्य झी २४ तास
१. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने वर्ष २०१९ मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या काही मासांत राज्यात ‘टीईटी’ घोटाळा टप्प्याटप्प्याने उघडकीस आला. याचे धागेदोरे राज्यातील मोठमोठ्या शहरांत आढळून आले होते.
२. परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी ७ सहस्र ८८० उमेदवार बनावट प्रमाणपत्रधारक म्हणून आढळून आले आहेत. या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दीड ते २ लाख रुपये घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
३. या परीक्षेमध्ये झालेल्या अपहार प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते. राज्यभरात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात नाशिक येथील ३७ शिक्षक आणि २ लिपीक आहेत. यात २७ पुरुष आणि १२ महिला कर्मचारी यांचा समावेश आहे.
संपादकीय भूमिका७ सहस्र बनावट शिक्षकांची नेमणूक होईपर्यंत शिक्षण विभाग झोपला होता का ? |