पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांकडून आक्रमणाची शक्यता

चंडीगड – पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ ऑगस्टला पंजाबच्या मोहाली शहराच्या दौर्‍यावर जाणार आहेत. ते ‘टाटा कॅन्सर हॉस्पिटल’चे उद्घाटन करणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. ही चंडीगड आणि मोहाली येथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. खलिस्तानी आतंकवादी कोणत्याही बसस्थानकावर आक्रमण करू करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी पंजाब सरकारला दिली आहे.

१. काही दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी देहलीतून ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना पकडले होते. त्यांच्या चौकशीमध्ये त्यांनी सांगितले की, देहली, मोगा आणि मोहाली येथे आतंकवादी घातपात करणार आहेत.

२. पंजाबमधील काही नेते आणि अधिकारी हेही आतंकवाद्यांचे लक्ष्य आहेत. त्यांत माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा, माजी मंत्री गुरकीरत कोटली, विजयंदर सिंगला आणि परमिंदर पिंकी ही प्रमुख नावे आहेत. केंद्रीय गुप्तचर संस्थेने पंजाब पोलिसांना १० जणांची सूची पाठवली आहे. या सर्वांची सुरक्षा वाढवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

खलिस्तानी आतंकवाद्यांची नांगी यापूर्वी ठेचण्यात आलेली आहे. आता त्यांची पुन्हा वळवळ चालू आहे.  या आतंकवाद्यांनी पुन्हा तोंड वर काढण्यापूर्वीच त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक !