कर्नाटकमध्ये श्री गणेश मंडपांत श्री गणेशमूर्तीच्या शेजारी वीर सावरकरांचे छायाचित्र लावणार ! – हिंदु संघटनांचा निर्णय

बेंगळुरू – कर्नाटकातील हिंदु संघटनांनी यंदाच्या श्री गणेशोत्सवात श्री गणेशमूर्तीच्या शेजारी वीर सावरकरांचे छायाचित्र लावण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्टपासून श्री गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून यामध्ये समाजातील सर्व घटक सहभागी होतात. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून लोकांना हा उत्सव साजरा करता आला नसल्याने यंदाच्या वर्षी भव्य उत्सवाची सिद्धता चालू  झाली आहे.

कर्नाटकमध्ये शिवम्मोगा आणि अन्य ठिकाणी १५ ऑगस्टला स्वातंत्र्याच्या अमृतम होत्सवाच्या निमित्ताने वीर सावरकरांचे फलक लावण्यात आल्यानंतर वाद झाला होता. श्री गणेशोत्सवात वीर सावरकरांचे छायाचित्र गणेशमूर्तीच्या शेजारी लावण्याच्या हिंदु संघटनांच्या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यभर प्रत्येक गल्लीत श्री गणेश मंडप उभारून श्री गणेशोत्सव साजरा केला जातो.

गणेशोत्सवात वीर सावरकरांविषयी जनजागृती करणार ! – प्रमोद मुतालिक

प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी हिंदु कार्यकर्त्यांना श्री गणेशाच्या मूर्तीजवळ वीर सावरकरांचे चित्र लावण्याचे आवाहन केले आहे. श्रीराम सेनेने यंदाचा गणेशोत्सव वीर सावरकरांचा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या गणेशोत्सवाच्या कालावधीत कर्नाटकात स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांच्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी शाळांमध्ये श्री गणेशोत्सव साजरा करण्यास अनुमती दिली आहे.