न्यूयॉर्कमध्ये हिंदु मंदिराच्या आवारातील म. गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड

अद्याप कुणालाही अटक नाही !

म. गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड

न्यूयॉर्क (अमेरिका) – साऊथ रिचमंड हिल येथील क्वीन्स काऊंटीमधील श्री तुलसी मंदिर परिसरात १८ ऑगस्टच्या मध्यरात्री म. गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी तोडफोड केली. त्यानंतर तेथील रस्त्यावर मोठ्या अक्षरांत ‘ग्रॅण्डपी’ आणि ‘डॉग’ असे शब्द लिहून हिंदूंच्या विरोधात द्वेष व्यक्त करण्यात आला. ६ लोकांनी ही तोडफोड करून पलायन केले. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. मागील दोन आठवड्यांत अशा प्रकारच्या तोडफोडीची ही दुसरी घटना आहे. ‘आक्रमणकर्ते तोडफोड करतांना हिंदी भाषेत बोलत होते’, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.

अमेरिकेत गांधी यांच्या पुतळ्यांची सातत्याने तोडफोड

यापूर्वी जून २०२० मध्ये वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासाबाहेरील गांधी यांच्या पुतळ्यावर ‘स्प्रे पेंटिंग’ करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा या पुतळ्याची हानी करण्यात आली होती. जानेवारी २०२१ मध्ये कॅलिफोर्नियातील सेंट्रल पार्कमध्ये गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. यंदा २६ जानेवारीला वॉशिंग्टनमधील गांधी यांच्या पुतळ्यावर खलिस्तानवाद्यांनी त्यांचा झेंडा फडकावला होता.